Home / महाराष्ट्र / Vinayak Raut : दुसऱ्या कोणाला संधी मिळू नये म्हणूनच त्यांनी गेम केला;शेवटच्या क्षणापर्यंत उद्धवजी वाट पाहत होते, पण…बाळ मानेंच्या ‘त्या’ खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप! पाहा नक्की काय घडलं?

Vinayak Raut : दुसऱ्या कोणाला संधी मिळू नये म्हणूनच त्यांनी गेम केला;शेवटच्या क्षणापर्यंत उद्धवजी वाट पाहत होते, पण…बाळ मानेंच्या ‘त्या’ खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप! पाहा नक्की काय घडलं?

Vinayak Raut : कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत एक अत्यंत नाट्यमय आणि अभूतपूर्व घडामोड समोर आली...

By: Team Navakal
Vinayak Raut
Social + WhatsApp CTA

Vinayak Raut : कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत एक अत्यंत नाट्यमय आणि अभूतपूर्व घडामोड समोर आली आहे. या मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) बाळ माने अशी चुरशीची लढत रंगणार होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बाळ माने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज अचानक मागे घेतला. विशेष म्हणजे, अर्ज मागे घेताना त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री नितेश राणे उपस्थित होते. या धक्कादायक घडामोडीमुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात बाळ माने यांच्याविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विश्वासघाताची गंभीर दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बाळ माने यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली असून, खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून या कारवाईची अधिकृत घोषणा केली. या संपूर्ण राजकीय भूकंपावर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अनेक खळबळजनक आणि विस्तृत खुलासे केले आहेत.

मातोश्रीवर उद्धव ठाकरे वाट पाहत होते, पण…
अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांसमोर अशी सारवासारव केली होती की, महायुतीचा आपल्यावर प्रचंड राजकीय दबाव होता आणि या संदर्भात आपण मातोश्रीवर वरिष्ठ नेत्यांशी तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. बाळ माने यांच्या या विधानाचा विनायक राऊत यांनी “चोराच्या उलट्या बोंबा” अशा शद्बांत तीव्र समाचार घेतला. राऊत यांनी सांगितले की, “बाळ माने हे निव्वळ थापा मारत आहेत. परवाच्या दिवशी ते मुंबईत आले होते आणि मी उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला येतोय, पुष्पगुच्छ घेतोय, आता गाडीत बसलोय, आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि पुढच्या पाच मिनिटांत मातोश्रीवर पोहोचतोय, असे सतत फोनवरून सांगत होते. बाळ माने भेटायला येत आहेत म्हणून स्वतः उद्धव ठाकरे साहेब दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत खाली थांबून त्यांची वाट पाहत होते. मात्र, हा माणूस जाणीवपूर्वक भेटायला गेलाच नाही. फसवणूक आणि थापेबाजी करणे हाच बाळ माने यांचा खरा धंदा आहे.”

डमी उमेदवाराची संधी हुकवण्यासाठी रचले सूचक सह्यांचे षडयंत्र-
बाळ माने यांनी महायुतीशी संधान बांधून हा घातपात आधीच ठरवला होता का? या प्रश्नावर बोलताना विनायक राऊत यांनी सांगितले की, हे पंधरा दिवसांपूर्वीच रचलेले शंभर टक्के ठरवून केलेले कपटकारस्थान होते. निवडणूक जाहीर होताच माने यांनी उमेदवारी अर्ज घेतले आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व मतदारांच्या सह्या आधीच घेऊन ठेवल्या. वास्तविक पाहता चार अर्ज भरण्यासाठी केवळ ४० सूचकांच्या सह्यांची आवश्यकता होती, परंतु माने यांनी सर्व मतदारांच्या सह्या घेण्यामागे एक अत्यंत शांत डोक्याने रचलेले षडयंत्र होते. महाविकास आघाडीला त्यांच्या दगाबाजीची कुणकुण लागून शेवटच्या क्षणी दुसरा कोणी डमी उमेदवार उभा करता येऊ नये आणि पक्षाला सूचकच मिळू नयेत, या कुटिल हेतूने त्यांनी सर्वांच्या सह्या आधीच गोळा करून पक्षाची नाकेबंदी केली होती, अशी माहिती आता समोर येत आहे.

‘२० खोक्यांचा बकरा’ आणि गोव्यातील जुने आर्थिक व्यवहार-
बाळ माने यांनी “घोडेबाजार आणि पैशांचे वाटप टाळण्यासाठी आपण अर्ज मागे घेतला” असा दावा केला होता. त्यावर पलटवार करताना विनायक राऊत म्हणाले की, “जर असा प्रकार होता, तर मग त्यांनी दोन दिवस मातोश्रीवर येऊन उद्धव साहेबांना ही परिस्थिती का पटवून दिली नाही? सध्या संपूर्ण रायगड आणि देवगड परिसरातील जनतेमध्ये ‘२० खोक्यांचा बकरा’ (२० कोटी रुपये) अशीच चर्चा उघडपणे सुरू आहे. २० कोटी रुपये घेऊन त्यांनी ही उमेदवारी मागे घेतल्याचे लोकांना चांगलेच ठाऊक आहे.” विनायक राऊत यांनी बाळ माने यांच्या जुन्या राजकीय कार्यपद्धतीवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “बाळ माने यांची ही प्रवृत्ती नवीन नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराकडून गोव्यात जाऊन पैसे घेतले होते. ज्या पक्षात जायचे, तिथे राहून केवळ स्वतःचा वैयक्तिक आणि आर्थिक स्वार्थ साधणे हेच त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.”

पक्षाचा निधी आणि बेईमानीची अवलाद-
बाळ माने यांनी विनायक राऊत यांच्यावर उलट आरोप करत पालघर लोकसभा निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे राऊत यांनी जाहीर आव्हान देत खंडन केले. राऊत म्हणाले, “जर मी पैसे घेतले असतील आणि तुला त्याची माहिती असेल, तर ते पैसे आणून दाखव. ज्याने कोणी ते पैसे दिले असतील, त्यातील ५० टक्के रक्कम तू स्वतः बक्षीस म्हणून ठेव आणि उर्वरित ५० टक्के आम्हाला आणून दे, आम्ही ते पैसे शिवसेना पक्षाच्या अधिकृत निधीमध्ये जमा करू. शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी बेईमानी करणारी विनायक राऊतांची अवलाद नाही, ती अवलाद बाळ माने यांची आहे.” बाळ माने यांनी आधी भारतीय जनता पक्षाशी बेईमानी करून शिवसेनेत प्रवेश केला, तिथे आल्यानंतर भाजपचा एकही कार्यकर्ता सोबत न आणता केवळ स्वतःसाठी विधानसभेची उमेदवारी मिळवली. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीतही उद्धव साहेबांना फसवून स्वतःच्या घरात उमेदवारी घेतली, जिथे पक्षाचा नगराध्यक्ष सहज निवडून आला असता, तिथे माने यांच्या स्वार्थामुळे पक्षावर नामुष्की ओढवली.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या