Watermelon Death Mumbai : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक धक्कादायक वळण समोर आले असून, मृतांच्या शरीरात ‘वेदनाशामक’ (Painkiller) औषधासारखा संशयास्पद पदार्थ आढळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जेजे रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनादरम्यान हे निष्कर्ष हाती आले असले, तरी रुग्णालय प्रशासनाने अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.
अन्न विषबाधा की घातपात? डॉक्टरांचा संशय-
रविवारी जेजे रुग्णालयात उपचार सुरू असताना आई-वडील आणि त्यांच्या दोन निष्पाप मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या ‘अन्न विषबाधेचे’ (Food Poisoning) असल्याचे वाटत होते. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, केवळ अन्नातून होणाऱ्या सामान्य विषबाधेमुळे संपूर्ण कुटुंबाचा इतक्या वेगाने मृत्यू होणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. त्यामुळे या अन्नामध्ये नेमके कोणते विषारी घटक मिसळले गेले होते किंवा हा घातपाताचा प्रकार आहे का, या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
कलिंगड विक्रेत्याची चौकशी आणि संशयास्पद मौन-
ज्या कलिंगडाचे सेवन केल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली होती, त्या विक्रेत्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अब्दुल्ला नामक या विक्रेत्याची पायधुनी पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केली. पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना तो प्रचंड अस्वस्थ दिसत होता. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्याने काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया न देता, केवळ हातवारे करून त्याने आपला संताप व्यक्त केला. त्याच्या वागण्यातील ही अस्वस्थता आणि मौन यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.
कुटुंबाचा अकाली अंत: परिसरावर शोककळा-
डोकाडिया कुटुंबाचा अशा प्रकारे एकाएकी अंत झाल्यामुळे पायधुनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी घरातील चारही सदस्यांची प्राणज्योत मालवल्याने परिसरात दहशतीचे आणि दुखाचे वातावरण आहे. पोलीस आता कलिंगड विक्रीच्या साखळीतील इतर लोकांचीही चौकशी करत असून, अन्नातील तो ‘वेदनाशामक’ पदार्थ चुकून गेला की जाणीवपूर्वक टाकला गेला, याचा शोध घेत आहेत.











