Home / मनोरंजन / Shahajiraje Movie: महाराष्ट्र दिनी मोठी घोषणा! पराक्रमी ‘शहाजीराजे’ यांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर; ६ भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Shahajiraje Movie: महाराष्ट्र दिनी मोठी घोषणा! पराक्रमी ‘शहाजीराजे’ यांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर; ६ भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Shahajiraje Movie: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी चित्रपटसृष्टीत एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि भव्य ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘गोंधळ’...

By: Team Navakal
Shahajiraje Movie
Social + WhatsApp CTA

Shahajiraje Movie: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी चित्रपटसृष्टीत एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि भव्य ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘गोंधळ’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक संतोष डावखर आता स्वराज्यसंकल्पक ‘शहाजीराजे’ यांचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत.

‘डावखर फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, यामुळे शिवप्रेमी आणि चित्रपट रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोस्टरमधून दिसली पराक्रमाची झलक

नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये शहाजीराजे भोसले यांचा अत्यंत गंभीर, तेजस्वी आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यामागे वाहणारा वारा त्या काळातील रणभूमीचा थरार आणि संघर्षाची जाणीव करून देतो. विशेष म्हणजे, शहाजीराजे यांच्या जीवनावर आधारित स्वतंत्र चित्रपट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. संतोष डावखर यांनी नेहमीच संस्कृती आणि इतिहासाशी जोडलेले विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

६ भाषांमध्ये जागतिक स्तरावर झेप

‘शहाजीराजे’ हा चित्रपट केवळ मराठीपुरता मर्यादित नसून तो दाक्षिणात्य प्रेक्षकांपर्यंतही पोहोचणार आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. २०२७ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात धडकणार असून त्याची मांडणी अत्यंत दिमाखदार असणार आहे.

प्रमुख भूमिकेत कोण? दाक्षिणात्य सुपरस्टारची चर्चा

चित्रपटाच्या घोषणेसोबतच एका प्रश्नाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे, तो म्हणजे शहाजीराजेंची भूमिका कोण साकारणार? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक भूमिकेसाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे. शहाजीराजेंचे शौर्य आणि दूरदृष्टी मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडण्यासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे.

दिग्दर्शकाची भूमिका

या घोषणेबद्दल बोलताना दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “महाराष्ट्र दिनी या चित्रपटाची घोषणा करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शहाजीराजे हे आपल्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.”

हे देखील वाचा – Maharashtra Day 2026: 1 मे हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो? वाचा सविस्तर इतिहास

Web Title:
संबंधित बातम्या