Home / महाराष्ट्र / Bachu Kadu : विधानपरिषद आमदारकीसाठी बच्चू कडू शिंदे पक्षात दाखल! नीलम गोर्‍हेंच्या उमेदवारीने नाराजी! मविआत धुसफूस

Bachu Kadu : विधानपरिषद आमदारकीसाठी बच्चू कडू शिंदे पक्षात दाखल! नीलम गोर्‍हेंच्या उमेदवारीने नाराजी! मविआत धुसफूस

Bachu Kadu : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


Bachu Kadu : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली. बिनधास्त-बेधडक नेता अशी ओळख असलेले बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार संघटनेला दूर ठेवत विधानपरिषद आमदारकी मिळवण्यासाठी शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेसेनेने आपला दुसरा उमेदवार म्हणून नीलम गोर्‍हे यांच्या नावाची घोषणा करताच पक्षात नाराजीचे सूर उमटले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील एकमेव जागेसाठी अमोल मिटकरींना टाळून मयत बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली.त्यामुळे मिटकरी नाराज झाले. तर शेवटच्या तासापर्यंत धुसफूस सुरू असलेल्या महाविकास आघाडीत कशीबशी दिलजमाई झाली. काँग्रेसने शेवटच्या क्षणी माघार घेत शिवसेना उबाठाचे अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर दानवे यांना पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी भाजपानेही सहावा उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.


विधान परिषदेवरील नऊ जागांपैकी महायुतीतील संख्याबळानुसार भाजपाला सर्वाधिक पाच जागा, शिंदेंच्या शिवसेनेला दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा आणि मविआला एक जागा मिळाली आहे. त्यानुसार भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची यादी 28 एप्रिल रोजीच जाहीर केली. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार हे पाच उमेदवार नियमित निवडणुकीसाठी तर प्रज्ञा सातव यांना पोट निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटातून झिशान सिद्दिकी यांचे नाव कालच निश्चित करण्यात आले होते. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिंदेंच्या शिवसेनेतून कोणा कोणाला संधी मिळणार हे आज दुपारपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. मात्र बच्चू कडू यांना पक्ष विलीन करण्याच्या अटीवर शिंदेसेनेतून उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त कालच आले होते. परंतु बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची काल भेट झाली नव्हती. आज बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदेंच्या उपस्थितीत कडूंनी शिंदेसेनेत जाहीरपणे प्रवेश केला. शिंदेसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरून कडू यांनी शिंदे यांच्या हाती दिला. याप्रसंगी बच्चू कडू यांनी आपण शेतकरी,मजूर, दिव्यांग आणि वंचितांच्या कल्याणासाठी शिंदेसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांची प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना या पूर्वीप्रमाणे समाजाच्या कल्याणासाठी पूर्वीच्याच तडफेने स्वतंत्रपणे काम करत राहतील असे कडू यांनी सांगितले. कडू यांचा पक्षप्रवेश होण्याच्या काही वेळ आधी प्रसिध्दी माध्यमांनी वारंवार विचारल्यानंतर शिंदे यांनी दुसरा उमेदवार म्हणून नीलम गोर्‍हे यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. गोर्‍हे यांना उमेदवारी देण्यास पक्षातून विरोध होता. मात्र पक्षप्रमुख या नात्याने एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत विरोध डावलून गोर्‍हे यांना उमेदवारी दिली.


मविआतील घटक पक्षांकडे मिळून एकच जागा मिळू शकेल एवढे संख्याबळ आहे. ही एकमेव जागा स्वतः उद्धव ठाकरे यांनी लढवावी असा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता.मात्र उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे मविआमध्ये पेच होता. काल दुपारी उबाठाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी अचानक अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करताच मविआत धुसफूस सुरू झाली. आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय का जाहीर केला असा आक्षेप घेत काँग्रेस पक्ष नाराज झाला. दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी उघड विरोध करत काँग्रेस उमेदवार उभा करील, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे मविआमध्ये उबाठा आणि काँग्रेस यांच्यात धुसफूस सुरू झाली.
गांधी भवनवर काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. ही बैठक सुरू असताना उबाठाचे अनिल परब, अनिल देसाई आणि स्वतः अंबादास दानवे काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी गांधी भवनवर गेले. तिथे बराच वेळ खलबते केल्यानंतर अखेर मविआतील तिढा मिटला. दोन वर्षांनंतर होणार असलेल्या राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसलाच प्राधान्य दिले जावे, अशा अटीवर काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर मविआच्या वतीने घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी दानवे हेच मविआचे उमेदवार असतील आणि काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल, अशी घोषणा केली.

नीलम गोर्‍हे यांचा राजकीय प्रवास
डॉ.नीलम गोर्‍हे यांनी राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिपमध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूकही लढवली. त्यानंतर त्यांनी काही काळ शरद पवार यांच्यासोबत काम केले. मग त्या रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षात गेल्या. यानंतर 22 फेब्रुवारी 1998 रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2005 मध्ये त्या शिवसेनेच्या उपनेत्या झाल्या, 2007 मध्ये प्रवक्त्या आणि 2010 मध्ये पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2016 ते 2018 दरम्यान त्यांनी सिनेट सदस्य म्हणून काम पाहिले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात 24 जून 2019 रोजी त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सप्टेंबर 2020 मध्ये त्या पुन्हा विधानपरिषदेवर गेल्या आणि या पदावर कायम राहिल्या. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी चार वेळा काम केले आहे. शिवसेना फुटीनंतर 7 जुलै 2023 रोजी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केला. आता या पक्षातून त्यांना पुन्हा विधानपरिषद सदस्यत्व मिळणार आहे.

निवडून येण्याची क्षमता संपली
बच्चू कडूंवर राऊतांची टीका

बच्चू कडू यांनी शिंदेसेनेत अधिकृतपणे प्रवेश करताच उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कडूंवर हल्ला चढवला. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडू यांनी आपला पक्षच शिंदेसेनेत विलीन केला याचा अर्थ निवडणूक लढून विधान सभेवर निवडून येण्याची कडू यांची क्षमता संपुष्टात आली, असे राऊत म्हणाले. याच बच्चू कडू यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना आपल्या सरकारमध्ये मंत्रिपद दिले होते. पण आता काय बोलणार, असे म्हणत राऊत यांनी कडूंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

लढाईचे हेच फळ मिळाले
अमोल मिटकरींची पोस्ट

राष्ट्रवादी अजित पवार गटातून झिशान सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा होताच अमोल मिटकरी यांनी एक्स सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. माझ्या लढाईचे हेच फळ मिळेल, ही मानसिक तयारी मी 29 जानेवारीलाच केली होती . दादा…हरकत नाही…दादा तुमच्यासाठी एक संधी काय अशा हजार संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई मी कालही लढत होतो,आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहीन. या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही. तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. अपघातामागचे सत्य जगासमोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही. वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेन, असे मिटकरी यांनी पोस्टमध्ये लिहिले. मुझे मिटाने की इतनी भी जल्दी क्या थी , थोडा वक्त देते, मै खुद ही राख बन जाता.. दादा मिस यू ,असे म्हणत शेवटी मिटकरी यांनी पक्षांतर्गत विरोधकांना भावनिक संदेश दिला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या