अभिनेते, ‘डीएमडीके’चे संस्थापक कॅप्टन विजयकांत यांचे निधन

चेन्नई :

द्रविड़ मुनेत्र कड़गम (डीएमडीके) पक्षाचे संस्थापक, राजकीय नेते आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचे आज चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, नंतर ते व्हेटिंलेटर सपोर्टवर होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७१ वर्षांचे होते.

विजयकांत हे लोकप्रिय तमिळ अभिनेते होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी १५४ चित्रपटांमध्ये काम केले होते. नदीगर संगम म्हणजेच दक्षिण भारतीय कलाकारांची संघटना मध्ये पदावर असताना त्यांनी दक्षिण चित्रपट उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणले होते. अभिनयाबरोबरच त्यांनी केलेल्या कामांमुळेही ते लोकप्रिय होते. त्यांनी २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली होती.

२००६ मध्ये त्यांच्या पक्षाने विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवली आणि एकूण मतदानाच्या १० टक्के मते मिळविली. मात्र, त्यांच्याशिवाय पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. २०११ मध्ये डीएमडीकेने एआयडीएमकेनेबरोबर युती करून निवडणूक लढवली आणि ४१ जागांपैकी २६ जागा जिंकल्या होत्या. त्या वर्षी त्यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. विजयकांत यांनी २०११ ते २०१६ पर्यंत तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते. राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

विजयकांत यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “थिरू विजयकांतजी यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. तमिळ चित्रपट जगतातील एक अभिनेते ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली. ते माझे जवळचे मित्र होते. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांबरोबर माझी सहानुभूती आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top