आई-वडिलांना मोठा दिलासा मिळणार आत्महत्या पद्धत सांगणार्‍या पोस्ट ब्लॉक

कॅलिफोर्निया – फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल साइट्स चालवणार्‍या मेटा कंपनीने यापुढे किशोरवयीन मुलांच्या जीवाला धोका पोहोचेल, त्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होईल असा कोणताही कंटेंट किशोरवयीन मुलांच्या अकाउंटवरून हाइड करण्याचा (न दाखवण्याचा) निर्णय घेतला आहे. आत्महत्येची पद्धत सांगणार्‍या किंवा तत्सम कोणताही आक्षेपार्ह कंटेंट असलेल्या पोस्ट या मुलांच्या अकाउंटसाठी ब्लॉक केल्या जातील. आपले मूल सोशल साइट्सवर नेमके काय पाहते याचा घोर लागलेल्या पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
किशोरवयीन मुलांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आत्महत्या कशी करावी याची माहिती देणार्‍या, स्वतःला कसे जखमी करावे, नको ते पदार्थ कसे खावेत, अशाप्रकारच्या विकृत पोस्टस् मोठ्या प्रमाणावर केल्या जाऊ लागल्या आहेत. अशा प्रकारच्या विकृत पोस्टस्मुळे सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या मुलांच्या मनावर परिणाम होतो. आपला मुलगा किंवा मुलगी या असल्या गोष्टींत पडून स्वतःचे बरेवाईट तर करून घेणार नाहीत ना, अशी चिंता आई-वडिलांना सतत सतावत असते. त्यावर आता ‘मेटा’ या अग्रणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने पालकांना दिलासादायक ठरेल, असा निर्णय घेतला आहे. अशा ‘नको त्या’ पोस्ट हाईड करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे किशोरवयीन मुलांना अशा प्रकारचा कोणताही कंटेंट सर्च करण्याबाबतही बंधने येतील. सर्व किशोरवयीन मुलांची फेसबुक, इन्स्टा खाती ‘मोस्ट रेस्ट्रिव्ह सेटींग्ज’मध्ये टाकली जाणार आहेत. अर्थात जी मुले आपले खरे वय देऊन फेसबुक, इन्स्टा अकाउंट सुरू करतात त्यांच्यापर्यंतच मेटाला पोहोचता येईल.
एका ब्लॉग पोस्टमध्ये मेटाने ही माहिती दिली आहे. वयाला न शोभणारे अशा प्रकारचे कंटेंट किशोरवीन मुलांपर्यंत पोहोचू नये असा मेटाचा प्रयत्न राहिला आहे. त्या धोरणानुसार यापुढे अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्टस न दाखविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
मुलांना आमच्या अ‍ॅपवर चांगला कंटेंट उपलब्ध व्हावा, असे आमचे धोरण आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलांची अकाऊंटस ‘मोस्ट रेस्ट्रिक्टिव्ह सेटींग्ज’मध्ये टाकली जाणार आहेत. त्यामुळे त्यांना आक्षेपार्ह शब्द असलेले कंटेंट किशोरवयीन मुलांना फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवर सर्च करता येणार नाही, असेही मेटाने ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top