आजपासून अयोध्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सुरू 18 जानेवारीला रामाची मूर्ती गर्भगृहात ठेवणार

अयोध्या – अयोध्येतील राममंदिरात 22 जानेवारीला होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, या सोहळ्याच्या विधींना उद्या 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 18 जानेवारीला रामाची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार आहे. मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुख्य कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 पासून 1 वाजेपर्यंत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदी पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास हे यावेळी गर्भगृहात उपस्थित असतील, अशी माहिती राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
चंपत राय यांनी या सोहळ्याच्या विधींची तपशिलवार माहिती देताना सांगितले, पौष शुक्ल द्वादशीला दुपारी 12.20 वाजता प्राणप्रतिष्ठा सुरू होईल. हा मुहूर्त वाराणसीचे गणेश शास्त्री द्राविड यांनी काढला आहे. या सोहळ्याच्या विधींचे देखरेख, समन्वय, संचालन गणेश्वर शास्त्री द्राविड करतील, तर विधी वाराणसीचे लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित पार पाडतील. उद्यापासून पूजाविधी सुरू होतील. हे विधी 21 तारखेपर्यंत सुरू राहतील, तर 22 तारखेच्या मुख्य सोहळ्यासाठी देशातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
चंपत राय यांनी प्रतिष्ठापना होणार्‍या रामाच्या मूर्तीची माहितीही दिली. त्यांनी सांगितले की, श्रीरामाची दगडी मूर्ती पाच वर्षांच्या बालक रुपातील उभी मूर्ती आहे. तिचे वजन 120 ते 200 किलो इतके आहे. 18 जानेवारीला मूर्ती गर्भगृहात आणली जाईल. ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, तिचा जलवास, अन्न, औषध, फळे, तूप अशांमध्ये निवास केला जाईल. म्हणजे अधिवास केला जाईल. जलवास, अन्नवास आणि शय्यावास हे साधारणपणे केले जातात. कठोर कर्मी असेल, तर इतर वास करू शकतात. राममंदिरात नव्या मूर्तीबरोबर मंदिरात इतरत्र रामलल्लाची जुनी मूर्तीही ठेवली जाणार आहे.
22 जानेवारीला सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सर्व विश्वस्त, 150 संत, धर्माचार्य उपस्थित असतील. त्यांच्यासोबत क्रीडा, विज्ञान, साहित्य, प्रशासन, न्यायपालिका, लेखक, कलाकार, मूर्तीकार अशा प्रत्येक विद्येतील श्रेष्ठींना आमंत्रित करण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम करणार्‍या लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो आणि टाटा इंजिनियर्सचे प्रतिनिधी, सर्वधर्मांचे उपासक यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, अशीही माहिती चंपत राय यांनी दिली.
प्राणप्रतिष्ठा 12.20 ते दुपारी 1.00 या काळात होईल. त्याची माहिती देताना चंपत राय म्हणाले की, प्राणप्रतिष्ठेआधी 10 वाजता मंगल ध्वनीचे आयोजन केले जाईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यावर सर्व प्रमुख अतिथी मनोभावे प्रकट करतील. नृत्यगोपालदास महाराज आशीर्वाद देतील. याला 65 मिनिटे लागतील. मानसरोवर, अमरनाथ, गंगोत्री, हरिद्वार, प्रयागराज संगम, नर्मदा, गोदावरी, नाशिक, गोकर्ण, येथून जल आणले आहे. दक्षिण नेपाळमधील मिथिलेशी जोडलेल्या भागातून भेट आली आहे. अन्न, वस्त्र, सोने, चांदी आले आहे. सीतामढी, छत्तीसगढहूनही भेटी आल्या आहेत. 20 आणि 21 जानेवारीला दर्शन बंद राहाणार आहे. प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आत 8 हजार खुर्च्या लावल्या जातील.
जे अयोध्येला येऊ शकणार नाहीत त्यांनी काय करावे ते सांगताना चंपत राय म्हणाले की, 22 तारखेपर्यंत आपापल्या मंदिरात स्वच्छता करावी, 22 जानेवारीला भजन, कीर्तन, एलईडी लावून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचे नियोजन, शंखवादन, प्रसाद वाटप करावे, अयोध्येत 5.50 वाजता सूर्यास्त होईल, तेव्हा संध्याकाळी सहा वाजल्यानंतर घराबाहेर पाच दिव्यांचे प्रज्ज्वलन करावे, असेही आवाहन चंपत राय यांनी केले.

22 जानेवारीचा मुहूर्त
कोणत्याही पंचांगात नाही

ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती हे धर्माच्या आधारावर एकूणच प्राणपतिष्ठा सोहळ्याला जाहीर विरोध करीत आहेत. ते म्हणाले की, 10 फेब्रुवारीपर्यंत पौष सुरू आहे. शिवाय 22 जानेवारी हा शुभमुहूर्ताचा दिवस आहे. असे कोणत्याही पंचांगात लिहिलेले नाही. मंदिर हे भगवंताचे शरीर असते आणि मूर्ती म्हणजे आत्मा असतो. अद्याप मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. ज्या चौथर्‍यावर राममूर्तीची स्थापना केली जाणार आहे तो चौधरा बांधून पूर्ण झालेला नाही. असे असताना प्राणप्रतिष्ठा करणे धर्मानुसार अयोग्य आहे. आम्ही रामजन्मभूमीसाठी लढलो. न्यायालयात याचिका केली, रामजन्मभूमीचा निर्णय लागला तेव्हा आम्ही थांबलो. त्यानंतर मंदिर किती मोठे बांधायचे हा निर्णय आमचा नाही. पण आता प्राणप्रतिष्ठेवेळी धर्म काय सांगतो ते मांडणे आमचे काम आहे. दुर्दैव म्हणजे आम्ही आमचे मत मांडल्यावर आम्ही काँग्रेसी असल्याचा शिक्का आमच्यावर लावला. शंकराचार्य म्हणून आम्हाला सन्मान देत होते तेच आम्हाला शिव्या शाप देऊ लागले.

राम मंदिर दूरवर
बाबरी का पाडली?

बाबरी मशीद पाडून त्या ठिकाणी राम मंदिर उभारण्याची घोषणा झाली. कारण त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता असा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र जे राम मंदिर उभे राहिले आहे ते बाबरी मशिदीच्या जमिनीपासून तीन किलोमीटर दूर आहे. जर बाबरी मशिदीच्या ठिकाणी राम मंदिर बांधायचेच नव्हते तर बाबरी कशासाठी पाडली? असा सवाल केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top