इसिसशी संबंध! 41 ठिकाणी छापे बोरिवली गावाला पोलिसांनी वेढा घातला

ठाणे – जगभर धुमाकूळ घालणार्‍या ‘इसिस’ या कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनेशी संबंध असणार्‍यांना हुडकून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज पहाटेच देशभरात 44 ठिकाणी छापेमारी केली. ठाणे जिल्ह्यात त्यापैकी तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आले. यात मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील दोषी नाचणमुळे आधीपासून कुख्यात असलेल्या भिवंडीजवळच्या पडघा- बोरिवली गावांना तर पोलिसांनी वेढाच घातला. या गावात 31 ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचणसह 14 जणांना ताब्यात घेतले, तर अनेकांची कसून चौकशी केली आणि त्यांना मुंबईला आणून थेट पतियाळाला चौकशीसाठी नेण्याची तयारी केली गेली. ठाणे, पुणे, भिवंडी, अंधेरीसह देशात कर्नाटकातही छापे टाकले गेले.
गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी संघटनानांची भारतातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी एनआयएची कारवाई सुरू आहे. याचा भाग म्हणून तीन महिन्यांपूर्वी पुण्यातील कोथरुड येथून काही आरोपींना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून देशात घातपाती कारवाया करण्याचा आरोप होता. अटक केलेल्या शामील नाचण याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून एनआयएने आज मोठी कारवाई केली. पहाटेपासून सुरू झालेल्या या कारवाईत महाराष्ट्रासह कर्नाटकातील 44 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात सर्वात मोठी कारवाई ठाणे जिल्ह्यात करण्यात आली. ठाणे, मिरा रोड, राबोडी, भिवंडी येथे छापे टाकण्यात आले. भिवंडीतील पडघा- बोरिवली गावांत तब्बल 31 ठिकाणी छापे टाकले. या गावांत आज पहाटे पोलिसांच्या 50 ते 60 गाड्या आल्या. राज्य राखीव सुरक्षा दलाच्या (एसआरपीएफ) आठ तुकड्या गावात तैनात करण्यात आल्या. त्यानंतर या गावातून कुणालाही बाहेर येऊ वा गावात जाऊ देण्यात येत नव्हते. गावात कारवाई करीत 15 जणांना ताब्यात घेतले. त्यात मुंबईतील घाटकोपर आणि मुलुंड येथील रेल्वे बॉम्बस्फोटातील दोषी साकिब नाचणचाही समावेश आहे. या कारवाईमुळे बोरिवली गावातील गावकरी संतप्त झाले होते. पुणे दहशतवाद प्रकरणात पकडण्यात आलेले सहापैकी चार आरोपी
पडघ्यातीलच होते. ठाण्यातील राबोडी परिसरामधील चांदीवला या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहाणार्‍या आर्किटेक्ट अंजुम बापे कुटुंबावर आज एनआयएने छापा मारला. या कुटुंबाची पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत अशी चार तास चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान बापे कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल जप्त करून चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच कागदपत्रांची तपासणी केली. अंधेरी येथील मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागात एनआयएने छापे टाकले. एनआयएचे 20 हून अधिक अधिकारी छाप्यात सहभागी झाले होते. एनआयएने पुण्याच्या कोंढव्यातील तालाब मस्जिद आणि मोमिनपुरा परिसरातही छापा टाकला. इथल्या इग्निशीया आणि मोमीनपुरा येथील गुलमोहर या दोन इमारतींमध्ये काही जणांची चौकशी करून तीन जणांना अटक करण्यात आली. ते सर्व नोकरीनिमित्त पुण्यात राहात होते.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, मोबाईल फोन, धारदार शस्त्रे, तलवारी, आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क, बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे. या सर्वांना मुंबईला नेण्यात आले असून तिथून त्यांना पतियाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईत या संशयितांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या कारवायांत इसिसच्या हँडलर्सचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. भारतामध्ये इसिसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मोठे जाळे कार्यरत होते. महाराष्ट्रात अटक केलेले सगळे इसिसच्या महाराष्ट्र मोड्युलचे सदस्य आहेत. साकिब नाचण हा त्यांचा म्होरक्या होता. ते पडघा – बोरिवली येथून काम करत होते. ते बॉम्ब तयार करणे, इसिसचा प्रसार करणे यात सहभागी होते, असे आरोप आहेत.

पडघा-बोरिवली: सिमी ते इसिस
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात पडघा-बोरिवली ही जुळी गावे महामार्गाला लागून आहेत. जेमतेम 4,000 लोकसंख्या असलेली ही गावे बॉम्बस्फोटातील आरोपींची गावे म्हणून कुप्रसिद्ध झाली आहेत. या गावात मुस्लीम धर्मीय बहुसंख्य असून त्यात कट्टरपंथीयांची संख्या मोठी आहे. या गावांना मुक्त प्रदेश किंवा पवित्र ठिकाण या नावानेही ओळखले जाते. 1985 मध्ये कनिष्क विमान अपघातात या गावातील दोन तरुणांची नावे आली होती. तेव्हापासून ते दोघे फरार आहेत. 2002 – 03 मध्ये मुंबईत झालेल्या मुलुंड आणि प्रभादेवी येथे रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साकिब नाचणची धरपकड करण्यात आल्यावर हे गाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यावेळीही पडघा-बोरिवलीला पोलिसांच्या गाड्यांचा अनेक दिवस वेढा पडलेला असे. सिमी या त्यावेळी कार्यरत असलेल्या कट्टर संघटनेचे अनेक स्लीपर सेल होते, असा तपास यंत्रणांचा संशय होता. 2006 मध्ये मुंबईत उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेनंतरही या गावातील अनेक तरुणांची चौकशी करण्यात आली. साकिब नाचणला 10 वर्षांची कैद झाली. ही शिक्षा भोगून साकिब नाचण सुटल्यावर त्याचे गावात जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर पडघा तपास यंत्रणांच्या रडारवर असून आता सिमीची जागा इसिससारख्या जागतिक दहशतवादी संघटनेनी घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top