कर्नाटकला केंद्राने दुष्काळी मदत देण्याची सुरजेवालांची मागणी

बंगळुरू- कर्नाटक राज्य सरकारने एकूण २३६ तालुक्यांपैकी २२३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत.मात्र केंद्र सरकारने अद्याप कोणतीही मदत केलेली नाही.तरी केंद्राने या राज्याला दुष्काळ निवारणासाठी तत्काळ अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे.तसेच भाजप खासदार या परिस्थितीबाबत मौन बाळगून असल्याबाबत सुरजेवाला यांनी प्रश्न उपस्थित केला.
रणदीपसिंग सुरजेवाला यांनी आपली ही मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,कर्नाटक राज्यात यंदा तज्ज्ञांच्या अभ्यास अहवालानुसार ४८.१९ लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.यामध्ये छोटे, अल्पभूधारक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले आहेत.राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये एकूण १८१७७.४४ कोटींची मागणी केली आहे.त्यात इनपुट अनुदान म्हणून ४६६३.१२ कोटी, आपत्कालीन निधी म्हणून १२५७७.८६ कोटी आणि जनावरांसाठी ३६३.६८ कोटी रुपये देण्याबाबत उल्लेख केला आहे.मात्र केंद्र सरकारने या निवेदनाकडे सपशेल कानाडोळा केला असल्याचा आरोपही रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top