कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगभरातीलचाळीस टक्के नोकऱ्या जाणार

आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकऱ्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी केले आहे. याबाबतचा एक अहवालदेखील आयएमएफने प्रसिध्द केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणारे फायदे आणि तोटे या दोन्ही बाबत जॉर्जिव्हा यांनी वक्तव्य केले.

स्वित्झर्लंड येथील दाव्होस येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत सहभागी होण्यापूर्वी त्या बोलत होत्या. जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही ‘दुधारी तलवार’ ठरू शकते. या तंत्रज्ञानामुळे जगभरातील नोकऱ्यांना धोका आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादकतेच्या पातळीला आणि जागतिक वाढीला चालना देण्यासाठी एक मोठी संधी आहे. विकसनशील देशांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा फारसा परिणाम होणार नाही. तुमच्याकडे कौशल्यावर आधारित जितक्या अधिक नोकऱ्या असतील, त्यावर तेवढा अधिक परिणाम होईल. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे एकतर तुमची नोकरी पूर्णपणे जाऊ शकते किंवा त्यामध्ये अधिक सुलभता आणू शकते. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात अधिक उत्पादनक्षम व्हाल आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रगती होऊ शकते. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निम्म्या नोकऱ्यांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. जगभरामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विकसित आणि विकसनशील देशही हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरू लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता थोडी धडकी भरवणारी आहे. पण ती एक जबरदस्त संधी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top