जपान भूकंपाने हादरला! अणुप्रकल्पाला धोका नाही

टोकिओ- जगभर नववर्षांचे स्वागत होत असतानाच सोमवारी पहाटे प्रामुख्याने मध्य, उत्तर आणि पूर्व जपानला 7.6 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाने हादरवले. यानंतर जपानच्या हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये 2011 च्या त्सुनामी प्रकोपाच्या आणि अणुऊर्जा प्रकल्पाच्या विनाशाच्या आठवणी जाग्या होऊन भीतीची लाट उसळली. नंतर त्सुनामीचा धोका कमी झाला. मात्र किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात झाली. सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. शिका अणुप्रकल्पालाही इजा झाली नाही.
जपानच्या होंशू बेटावरील नोटो भागात 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर 7.6 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. त्यानंतर एकूण 19 भूकंपाचे धक्के जाणवले. 4.06 वाजता पहिला धक्का, तर 4.32 मिनिटांनी शेवटचा धक्का जाणवला. 7.6 तीव्रतेच्या भूकंपानंतर प्रशासन सतर्क झाले. नागरिकांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले. मध्य जपानमधील वाजिमा, इशकावा, टोयामा, निलिगाटा, यामागाट, होगो, सकाता या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही ठिकाणी समुद्रात 40 सेंटीमीटर ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. इशिकावा परिसरातील वाजिमा किनारपट्टीवर 1.2 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. भूकंपामुळे अनेक इमारती हलल्या . भिंतीना भेगा पडल्या . पूर्व जपानमधील काही रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या तर काही ठिकाणी बुलेट ट्रेनची वाहतूक थांबवण्यात आली. रस्त्यांना तडे गेले असल्याने मध्य जपानमधील अनेक महामार्ग बंद करण्यात आले. भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला .
भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी मिळेलं तिथे आश्रय घेतला. 11 मार्च 2011 रोजीही जपानमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्‌‍यानंतर त्सुनामी आली होती. त्यात 18,000 हून लोक मृत्युमुखी पडले होते. अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यावेळी फुकुशिमा अणुप्रकल्पात पाणी घुसल्याने किरणोत्साराचा धोका निर्माण झाला होता. त्यानंतर कोकणातील जैतापूर येथील प्रस्तावीत अणुऊर्जा प्रकल्पासहित जगभरातील अणु ऊर्जा प्रकल्पांना विरोध वाढला होता. आज झालेल्या भूकंपानंतर जपानच्या प्रमुख सचिव हायाशी योशिसावा यांनी शिका येथील अणुप्रकल्पाला धोका नसल्याचे सांगितले. जपानमधील भारतीय दुतावासाने भूकंप आणि त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर जपानमधील भारतीयांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top