ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांमध्ये अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल मध्यरात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या ७८ वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते, मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.

१९९५ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक करत असताना रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. २०११ पासून ते घशाच्या कर्करोगाशी लढत होते. गेले काही दिवस मुंबईच्या टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. रवींद्र बेर्डे यांनी तीनशेहून अधिक मराठी चित्रपटात काम केले आहे. मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवींद्र बेर्डे हे सख्खे बंधू, तर नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू आहेत. रवींद्र बेर्डे यांची नभोवाणीमुळे अभिनयाशी नाळ जोडली गेली. अगदी तरुण वयात ते नभोवाणीशी जोडले गेले. १९६५ पासून आकाशवाणीवर नभोनाट्यांचे दिग्दर्शन करता करता त्यांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. १९८७ साली त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आजवर ३१ नाटकांमध्ये काम केले होते. त्यांचे व्यक्तिमत्व आणि काहीसा विनोदी स्वभाव यामुळे सुरुवातीला खलनायकी आणि नंतर विनोदी व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. मालिका, जाहिराती, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी काम केले होते. होऊन जाउ दे, हमाल दे धमाल, थरथराट, चंगु मंगु, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा कित्येक मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top