डीआरडीओची लष्करासाठी उग्रम अॅसॉल्ट रायफल

नवी दिल्ली

संरक्षण क्षेत्रात भारत दररोज नवनवीन कामगिरी करत आहे. भारत या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेली आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीची उग्रम अॅसॉल्ट रायफल लष्कराच्या शस्त्रसाठ्यात दाखल केली आहे. डीआरडीओच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आणि हैदराबादच्या एका खासगी कंपनीच्या मदतीने ही रायफल विकसित करण्यात आली आहे.

उग्रम अॅसॉल्ट रायफल वजनाला अत्यंत हलकी असली तरी अतिशय घातक आहे. ही रायफल सध्याच्या एके २०३ रायफलीला पर्याय असेल. डीआरडीओच्या आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंगचे महासंचालक शैलेंद्र गाडे यांच्या हस्ते या ‘उग्रम’ रायफलीचे अनावरण करण्यात आले. या रायफलमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, यासाठी भारतीय लष्कराने डीआरडीओला मार्गदर्शन केले होते. या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर डीआरडीओच्या संशोधकांनी हैदराबादेतील एका खासगी उद्योगाच्या मदतीने या रायफलची निर्मिती केली. भारतीय लष्कराकडे सध्या एके २०३ रायफली आहेत. बहुतेक सर्व मोहिमांत त्यांचा वापर केला जातो. पण युक्रेन युद्धामुळे या रायफलींची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे एके २०३ ला पर्याय म्हणून उग्रम अॅसॉल्ट रायफलची निर्मीती करण्यात आली. या रायफलीच्या शास्त्रशुद्ध चाचण्यांना आता प्रारंभ होणार आहे. त्यातील निष्कर्ष समाधानकारक आल्यावर प्रत्यक्ष लष्कराकडून त्याची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर या रायफलींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top