दक्षिण मुंबईतील आश्रय योजनेचा खर्च तब्बल १०० कोटींनी वाढला

मुंबई- दक्षिण मुंबईतील डोंगरी,उमरखाडी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेअंतर्गत पुनर्विकास केला जाणार आहे.मात्र हा प्रकल्प सुरू होण्याआधीच डिझाइन आणि बिल्ट टर्नकी गट २ अंतर्गत देण्यात आलेल्या कंत्राट कामांमध्ये तब्बल १०० कोटींची वाढ झाली आहे.आता या कामाचा खर्च ६४७.५८ कोटी रुपयांवरून ७४०.६० कोटी रुपये एवढा म्हणजे १७ टक्क्यांनी वाढला आहे.

पालिकेच्या बी विभागातील
६४ जेल रोड,डोंगरी येथील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याच्या
प्रकल्पाला जुलै २०२१ रोजी मंजुरी दिली.यासाठी पुढील २४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरून या कामांसाठी शायोना कार्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ६४७.५८ कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या सेवा सदनिकांच्या पुनर्विकासाचे आराखडे सादर केले असता त्याठिकाणी एकत्रित पुनर्विकास शक्य नाही. त्यामुळे उत्तरेकडील तळ अधिक पाच आणि पूर्वेकडील तळमजला आधिक ४ अशा दोन इमारतींनाही या पुनर्विकासात समाविष्ट करणे बंधनकारक असल्याचे विकास नियोजन विभागाच्या प्रमुख अभियंत्याने स्पष्ट केले.

त्यामुळे या दोन इमारतींचा पुनर्विकासात समावेश करण्यात आला आणि ई विभागातील सिध्दार्थ नगर येथील बी इमारतही मोडकळीस आल्यामुळे या इमारतीचाही पुन्हा पुनर्विकासात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्षेत्रफळ वाढलेले असून बिल्टअप क्षेत्र, कार पार्किंग क्षेत्र, स्टेअर केस व लिफ्ट लॉबी क्षेत्र, रिफ्युज क्षेत्र, स्टेअर केस हेड रुम व लिफ्ट रुम, पाण्याची टाकी, मीटर रुम, सोसायटी कार्यालय स्टील्ट मजला, पंप रुम, एसटीपी, सुरक्षा चौकी, टेरेस मजला, इत्यादी विविध तरतुदींचा समावेश करण्यात आल्याने बांधकाम क्षेत्रफळ १ लाख ३२ हजार ९४९ चौरस मीटर होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ६४७.५८ कोटी रुपयांवरून ७४०.६० कोटी रुपये एवढा झाला आहे.यामध्ये ३०० चौरस फुटाच्या १९३१ सदनिका आणि ६०० चौरस फुटाच्या ८९ सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यामुळे बांधकामाचा कालावधी १२ महिन्यांनी वाढवून २४ महिन्यांऐवजी ३६ महिने असा करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top