दिवंगत पत्नीचा विरह सहन न झाल्याने पत्नीच्या तेराव्याला पतीने सोडले प्राण

छत्रपती संभाजी नगर- पती-पत्नी लग्न बंधनात अडकताना संपूर्ण जीवनभर साथ देण्याचे एकमेकांना वचन देत असतात.मात्र गंगापूर तालुक्यातील जामगांवामध्ये एका वृद्ध जोडप्याने मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडली नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहाने पतीने तेराव्याच्या कार्यक्रमानंतर प्राण सोडले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
७० वर्षांच्या नर्मदाबाई त्रिंबकराव मंडलीक यांचे १० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता हृदयविकाराने निधन झाले. पत्नीच्या निधनाने ७५ वर्षांचे पती त्रिंबकराव मंडलीक यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळातील अनेक व्याधींना धैर्याने तोंड देणाऱ्या त्रिंबकराव यांचा पत्नीच्या मृत्यूनंतर धीर तुटला.पत्नीचा तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुणे निघून जाताच २२ नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता त्रिंबकराव मंडलीक यांनी पत्नीच्या विरहात प्राण सोडले.
नर्मदा व त्रिंबकराव मंडलीक हे दोघे जामगांवातील रहिवाशी असून सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते.त्यांना एक मुलगा, दोन मुली, सुन नातवंडे असा परिवार आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबासाहेब मंडलीक यांचे आई-वडील होत.अत्यंत गरीब परिस्थितीत दोघांनी एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा मोठ्या कष्टाने ओढला.त्रिंबकराव मंडलीक यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता जामगांव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top