देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली

घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी

पंढरपूर

कार्तिकी एकादशीनिमित्त आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील माळेदुमाला येथील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला. गेल्या १५ वर्षांपासून घुगे दाम्पत्य न चुकता वारी करत आहे.

प्रथेप्रमाणे आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक महापूजा केली. पहाटे विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे फडणवीस दाम्पत्य आणि घुगे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर फडणवीसांनी सपत्नीक नीरा नरसिंह येथे कुलदैवताचे दर्शन घेतले. तेथे त्यांनी आरती केली व त्यानंतर ते राजस्थानला रवाना झाले. दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती. या सजावटीसाठी पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी ५ टन फुले दिली होती. यात एकूण २२ प्रकारच्या पाना फुलांचा वापर करण्यात आला असून, यासाठी तीन दिवसांपासून ३५ ते ४० कामगार काम करत होते. मंदिर प्रशासनाकडून आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top