नवाब मलिकांना अजित पवारांच्या बरोबर मागची सीट! सीट क्र.49!

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटासह सत्ताधार्‍यांच्या बाकावर जाऊन बसल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्षेप घेतल्याने नागपूर अधिवेशनात गदारोळ सुरू झाला. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच त्यांना सत्ताधारी बाकावरील आसन क्रमांक दिला होता. किंबहुना त्यांना थेट अजित पवारांच्या मागचा 49 क्रमांकाचा आसन क्रमांक देण्यात आला होता. तरीही तिथे न बसता नवाब मलिक हे अगदी मागे शेवटच्या रांगेत जाऊन बसले. नवाब मलिक हे जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांनी आपल्या गटात यावे यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंनी त्यांना फोन केला. शरद पवार आणि नवाब मलिक यांची भेट झाली. प्रफुल्ल पटेलांनी सुनील तटकरेंना सोबत घेऊन त्यांचे घर गाठले आणि त्यांना पेढा भरवला. पण नवाब मलिकांनी कोणत्याही एका गटाला लेखी पाठिंबा अद्याप दिलेला नाही. तरीही ते अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसताच फडणवीस यांनी आक्षेपाचे पत्रच प्रसिद्ध केले. हे पत्र प्रसिद्ध झाल्यावर मात्र अजित पवार आणि शरद पवार दोघेही मौन झाले. दोघांपैकी कुणीच मलिकांना पाठिंब दिला नाही. अजित पवारांकडे पुरेसा आकडा असल्याने त्यांना मलिकांची गरज नाही आणि शरद पवारांकडे कुणीच नसल्याने एक कमी झाल्याने त्यांना फरक पडत नाही. नवाब मलिकांना आपल्या गटात घेण्यासाठी उतावीळ झालेल्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी आता नवाब मलिकांना वार्‍यावर सोडले आहे.
उद्या नागपूर अधिवेशनात नवाब मलिक उपस्थित राहतात की, गैरहजर राहतात याकडे सर्वांचे लक्ष असले तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी मलिकांकडे कानाडोळा करण्यास सुरुवात केल्याने त्यांचा विषय आता थंडपेटीत ठेवला जाईल. दरम्यान, नागपूरच्या थंडीमुळे नवाब मलिक आजारी पडल्याची चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top