प. रेल्वे प्रवाशांच्या मनस्तापात भर एसीमुळे सामान्य गाड्यांच्या फेऱ्या कमी*गर्दीच्या वेळी केवळ एकच एसी फेरी वाढवली

मुंबई –
पश्चिम रेल्वेने सोमवारपासून एसीच्या नव्या १७ फेऱ्या वाढवून एसी गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. मात्र एसी लोकलच्या १७ फेऱ्या वाढवल्या तरी एकूण फेऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. म्हणजेच सध्या ज्या नॉन एसी गाड्या धावत आहेत, त्यापैकी काही फेऱ्या कमी करून त्या एसी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य नॉन एसी गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. याशिवाय वाढलेल्या नव्या एसी फेऱ्यांपैकी केवळ सायंकाळी ६.२२ वाजताची एकमेव चर्चगेट-विरार लोकल गर्दीच्या वेळी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे एसी गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनाही या नव्या फेऱ्यांमुळे मोठा दिलासा मिळालेला नाही.

पश्चिम रेल्वेने उद्या सोमवार ६ नोव्हेंबरपासून आणखी नवीन १७ एसी म्हणजेच वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे आता वातानुकूलित लोकल सेवेची एकूण संख्या ७९ वरून ९६ वर जाणार आहे. या १७ नव्या फेऱ्यांनंतरही एकूण फेऱ्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नसून त्या आधी इतक्याच १३९४ राहणार आहेत. त्यामुळे रेल्वेची ही एसीची फुंकर ना एसी प्रवाशांचा प्रवास सुखद करणार आहे , ना सामान्य प्रवाशांचा, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी सोशल मिडियावर देत आहेत. एसीच्या १७ पैकी ९ सेवा अप दिशेने तर ८ सेवा डाऊन दिशेने वाढल्या आहेत. याशिवाय डहाणू रोड ते अंधेरी असलेली एक एसी ट्रेन चर्चगेटपर्यंत वाढवण्यात आली आहे. या १७ फेऱ्या शनिवार-रविवार नॉन एसी असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top