फुफ्फुस नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात जखमी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पूर्ण केली

पुणे

प्रत्यारोपणासाठी फुफ्फुस घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला. मात्र, एका रुग्णाला जीवदान देण्यासाठी जखमी डॉक्टरांनी दुसऱ्या कारने चेन्नईला जाऊन यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पूर्ण केली. ही घटना पिंपरी चिंचवड ते चेन्नई या प्रवासादरम्यान घडली. हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर संजीव जाधव असे त्यांचे नाव असून त्यांच्या या कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉक्टर संजीव जाधव स्वतः रुग्णवाहिकेत पुढे बसले होते. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात एका फुफ्फुस दात्याची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते फुफ्फुस चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालय ते पुणे विमानतळ हा प्रवास रुग्णवाहिकेतून करत होते, यावेळी हॅरीस पुलाजवळ सायंकाळी ५ च्या सुमारास रुग्णवाहिकेचा टायर फुटला आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. रुग्णवाहिका दोन-तीन वाहनांना धडकली आणि रस्ता दुभाजकावर अडकली. या भीषण अपघातात चालक, डॉक्टर जाधव, ज्युनिअर डॉक्टर आणि दोन टेक्निशियन जखमी झाले, मात्र त्यांच्या पुढे फुफ्फुस चेन्नईला वेळेत पोहचवण्याचे आव्हान होते. त्यामुळे जखमी अवस्थेत असलेल्या डॉक्टर जाधवांनी खासगी वाहन बोलावले आणि पुणे विमानतळ गाठले. तिथून विमानाने ते चेन्नईला पोहचले. सायंकाळी ६:३० वाजता पोहचण्याचे ठरले होते, पण त्यांना पोहचायला रात्रीचे ८:३० वाजले, परंतु त्यानंतरही त्यांनी जखमी अवस्थेत रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. दरम्यान, शस्त्रक्रिया करण्यात आलेला रुग्ण ७२ दिवस लाईफ सपोर्टवर होता. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी सुधारत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top