बैरूतमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा नेता सालेह अरोरी ठार

बैरूत – इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरुतवर केलेल्या कथित ड्रोन हल्ल्यात हमासचा उपनेता सालेह अल अरोरी ठार झाला. हमासच्या प्रतिनिधीने या हल्ल्यात सालेहच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र इस्त्रायलच्या सैन्यप्रमुखांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अरोरीच्या मृत्यूमुळे हमास आणि इस्रायलमधील पश्चिम आशियातील संघर्ष चिघळण्याचा धोका वाढला आहे. इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून सालेह अरोरी हमासचा सर्वात वरिष्ठ नेता होता. या हल्ल्यात एकूण ६ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
सालेह अरोरी हमासच्या लष्करी शाखेचा संस्थापकही होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूचा बदला हमास घेण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या ड्रोनने हा हल्ला केल्याचे लेबनॉनच्या अधिकृत राष्ट्रीय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला. हिजबुल्लाहचा गड असलेल्या बैरूतमधील शियाबहुल जिल्ह्यातील एका निवासी इमारतीवर हा हल्ला झाला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी गाझामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यापासून हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यात इस्रायल-लेबनीज सीमेवर जवळजवळ दररोज चकमक उडत आहे. पत्रकारांशी बोलताना इस्रायलचे लष्कराचे प्रवक्ते रिअर अ‍ॅडमिरल डॅनियल हगॅरी यांनी अरोरी यांच्या मृत्यूचा थेट उल्लेख केला नाही. परंतु ते म्हणाले, की आम्ही ‘हमास’विरुद्धच्या लढाईवर लक्ष केंद्रित केले आहे आणि यापुढेही लक्ष केंद्रित करणार आहोत.
दरम्यान, इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी यांनी या युद्धाचे लोण आसपासच्या क्षेत्रातही पसरेल, अशी शक्यता वर्तवल्याचे त्यांच्या सहाय्यक फोरोन्सिया सोटोनिनो यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top