भाजपाचे ‘चलो अयोध्या’ राज्यांसाठी वेळापत्रक दिले

लखनौ – अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर, अवघा देश रामाच्या भक्तीमय वातावरणात तल्लीन असतानाच, त्या भक्तीच्या लाटेवर स्वार होत भाजपाने ‘अयोध्या चलो’हे अभियान सुरू केले आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपा हे अभियान 25 मार्चपर्यंत चालवणार आहे. यात देशातील भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री 31 जानेवारी ते 4 मार्च या काळात त्यांच्या मंत्रिमंडळासह येऊन श्रीराम दर्शन घेतील आणि अयोध्येतूनच आपापल्या राज्यांसाठी मोठमोठ्या योजनांची घोषणा करतील. भाजपाने राज्यांच्या अयोध्या दौऱ्याचे वेळापत्रकच जाहीर केले आहे.
अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर लोटत आहे. या अलोट गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन करण्याची, रामजन्मभूमीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती मतदारांना आकर्षित करून घेण्याची भाजपाला राजकीय संधी आहे. म्हणूनच भाजपाने आपली सत्ता असलेल्या राज्यांच्या मंत्रिमंडळांसाठी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी वेळापत्रक जारी केले आहे. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा 31 जानेवारीला संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या रामदर्शनाचा शुभारंभ करतील. महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळासह 5 फेब्रुवारी रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्याचबरोबर रेल्वेनेही प्रत्येक राज्यातील नागरिकांना अयोध्या दर्शन सहज करता यावे यासाठी विशेष आस्था रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत श्रीराम मंदिराचा मुद्दा जनतेच्या नजरेसमोर ठेवण्याची भाजपाने आखणी केली आहे.
राज्यांसाठी दर्शन वेळापत्रक
31 जानेवारी – त्रिपुरा, मुख्यमंत्री माणिक साहा यांचे मंत्रिमंडळ सर्वप्रथम रामलल्लाचे दर्शन घेईल.
1 फेब्रुवारी – उत्तर प्रदेश (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळ)
2 फेब्रुवारी – उत्तराखंड , (पुष्कर सिंह धामी)
5 फेब्रुवारी – महाराष्ट्र (एकनाथ शिंदे)
6 फेब्रुवारी – अरुणाचल प्रदेश (विमा खंडू)
9 फेब्रुवारी – हरियाणा (मोहनलाल खट्टर)
12 फेब्रुवारी – राजस्थान (भजनलाल शर्मा)
15 फेब्रुवारी – गोवा (डॉ. प्रमोद सावंत)
22 फेब्रुवारी – आसाम (हिमंत बिस्व सर्मा)
24 फेब्रुवारी – गुजरात (भूपेंद्र पटेल)
4 मार्च – मध्यप्रदेश (मोहन यादव)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top