भारत-ऑस्ट्रेलिया फायनलचा आज थरार 70 हजार कोटींचा सट्टा लागला! बुकींची भारताला पसंती

अहमदाबाद – विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. सगळ्या जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेला हा सामना अतिशय चुरशीचा होईल, अशी अपेक्षा आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे. सट्टेबाजारही सज्ज झाला आहे. या लढतीवर सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे. हा सामना वर्ल्डकप फायनलचे आतापर्यंतचे बेटिंगचे सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढणार असल्याचे बोलले जात आहे. सट्टेबाजांनी भारताला 45 पैसे, तर ऑस्ट्रेलियाला 57 पैसे भाव दिला आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात फेव्हरेट मानला जात आहे.
एकदिवसीय विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तगडे संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या सामन्याच्या एक दिवस आधीच सट्टेबाजार तेजीत आला आहे. या सामन्याच्या नाणेफेकीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत सट्टा लागला आहे. सट्टेबाजांनी या सगळ्याचा दर निश्‍चित केला आहे. त्यानुसार सट्टेबाजांनी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियापेक्षा कमी दर देऊन आपली पसंती दिली आहे. अंतिम लढतीत टीम इंडिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल, असाही अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. सट्टेबाजांनी निश्‍चित केलेल्या दरानुसार भारताने टॉस जिंकण्यावर 25 पैसे, तर ऑस्ट्रेलियासाठी 40 पैसे इतका दर आहे. प्रथम फलंदाजीसाठी भारताला 30 पैसे, तर ऑस्ट्रेलियाला 50 पैसे दर ठरवण्यात आला आहे. प्रथम गोलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियावर 15 पैसे आणि भारतासाठी 35 पैसे इतका दर आहे. फलंदाजांच्या बाबतीत विरोट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलकडून नाही तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला जास्त पसंती देण्यात आली आहे.
फलंदाजांना श्रेयस अय्यर (20 पैसे), के.एल. राहुल (20 पैसे)विराट कोहली (15 पैसे), शुभमन गिल (15 पैसे), रोहित शर्मा (10 पैसे), सूर्यकुमार यादव (10 पैसे) असा भाव आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या तुलनेत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहसाठी जास्त दर आहे. मोहम्मद सिराज (15 पैसे), जसप्रीत बुमराह (15 पैसे) मोहम्मद शमी (20 पैसे), कुलदीप यादव (25 पैसे) इतका भाव ठेवण्यात आला आहे.
या सामन्यात 50 षटकात किती धावा होतील, याचेही दर ठरले आहेत. त्यानुसार 250 ते 300 धावांसाठी 30 पैसे, 300 ते 350 धावांसाठी 45 पैसे, 350 ते 400 धावांसाठी 60 पैसे, तर 400 हून अधिक धावांसाठी 80 पैसे भाव आहे.
या सट्टेबाजीत दाऊद इब्राहिमची टोळी फॉर्ममध्ये असून मुंबई, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद, कराची, दुबई आणि बँकॉक येथे पसरलेल्या बुकींच्या नेटवर्कद्वारे सट्टा खेळला जात आहे. सट्टेबाजीत दाऊद इब्राहिमच्या टोळीची मक्तेदारी आहे. काही वर्षांपूर्वी छोटा राजनचा पाठीराखा असलेल्या विनोद चेंबूरने तिला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु 2015 मध्ये विनोदचा मृत्यू झाल्यानंतर दाऊद टोळीचेच सट्टाबाजारावर वर्चस्व आहे, अशी माहिती मिळत आहे.
मोदींसह सेलिब्रिटी आणि विश्‍वचषक विजेते कप्तान उपस्थित राहाणार?
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बीसीसीआयचा सचिव जय शहा, भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, राजीव शुक्ला, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त आठ राज्यांचे मुख्यमंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय, अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि इतर अनेक दिग्गज हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथन अल्बानीज यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लस या सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता अधिक आहे.
विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळींसह विश्‍वविजेत्या कर्णधारांना अंतिम सामन्यासाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान तुरुंगात असल्याने या कार्यक्रमाला मुकणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात 1992 मध्ये पाकिस्तानने विश्‍वचषक जिंकला होता.
माजी विश्‍वचषक विजेत्या कर्णधारांसाठी आयसीसीने विशेष ब्लेझरची व्यवस्था केली आहे. विश्‍वविजेत्या कर्णधारांमध्ये वेस्ट इंडिजचे क्लाइव्ह लॉयड, भारताचे कपिल देव, ऑस्ट्रेलियाचे अ‍ॅलन बॉर्डर, पाकिस्तानचे इम्रान खान, श्रीलंकेचे अर्जुन रणतुंगा, ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, भारताचा महेंद्रसिंग धोनी, ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन यांचा या यादीत समावेश आहे. मात्र, इम्रान खान तुरूंगात असल्यामुळे फायनलच्या लढतीचे साक्षीदार होणार नाहीत, तर अर्जुन रणतुंगा हेदेखील न येण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई-अहमदाबाद क्रिकेट विशेष ट्रेन
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना उद्या रविवारी 19 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मुंबईहून अहमदाबादला जाणार्‍या क्रिकेटप्रेमींची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक आणि पश्चिम रेल्वेने दोन अशा तीन क्रिकेट स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे.अंतिम सामन्यानिमित्त मुंबईतून अहमदाबाला जाणार्‍या या सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
क्रिकेट चाहत्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आज शनिवारी क्रिकेट स्पेशल गाडी चालविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज रात्री या तिन्ही क्रिकेट स्पेशल ट्रेन सीएसएमटी, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून अहमदाबादसाठी रवाना झाल्या. या स्पेशल गाड्यांचे आरक्षण शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू केले होते. या तिन्ही ट्रेन सोमवारी पहाटेपासून परतीचा प्रवास करणार आहेत.

समारोपाचा रंगारंग कार्यक्रम
अंतिम सामन्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामन्याच्या आधी भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण विमानांचा एअर शो होणार आहे. पहिल्या डावाच्या ड्रिंक्स ब्रेकला गुजराती गायक आदित्य गढवी यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दोन इनिग्जच्या मध्यंतराला प्रीतम चक्रवर्ती, जोतिका गांधी, नकाश अझिझ, अमित मिश्रा, अकासा सिंग आणि तुषार जोशी यांच्या गीतसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्‍या डावाच्या ड्रिंक्स ब्रेकला लेसर आणि लाइट शो होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top