मराठा आंदोलनाआधी सरकारकडून मनधरणी पण सगेसोयर्‍यांबद्दल कडूंकडून वाच्यता नाही

जालना – मुंबईतील मराठा आंदोलनाची आखणी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची आज आ. बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे शिष्टमंडळाने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जरांगे- पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत सरकारने तयार केलेला मसुदा देत असल्याचे सांगितले. परंतु पत्रकार परिषदेत जरांगेंची मूळ मागणी असलेल्या सगेसोयरे यांना आरक्षण देण्याबाबतच्या मुद्यावर बच्चू कडू काहीच बोलले नाहीत. त्यांनी पत्रकारांना मसुदा दाखवण्यास नकार दिला. दरम्यान, आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी आपल्या विरोधात मोठे षड्यंत्र सुरू आहे, असा सरकारवर गंभीर आरोप केला.
आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची विभागीय आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संभाजीनगर येथे आ. बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली. बच्चू कडू म्हणाले की, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असून, त्यांच्या वंशावळी शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मराठवाड्यात जुन्या नोंदी सापडताना अडचणी येत आहेत. बर्‍याच ठिकाणी कागदपत्रे गहाळ झाली आहेत. मात्र, एकेका जिल्ह्यात 30 ते 35 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. हे मनोज जरांगे यांचे आंदोलनाचे यश आहे. याशिवाय मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल यासंदर्भात एक मसुदा तयार करण्यात आला आहे. सरकार या संदर्भात अधिसूचना काढणार आहे. मनोज जरांगे यांना आम्ही मसुदा दाखवणार आहोत. त्यानंतर त्यांचा अभिप्राय घेऊन त्यांनी काही बदल सांगितला तर तो करून मसुद्यात सुधारणा करू.

सरकार मला ट्रॅप करण्याचे
षड्यंत्र रचत आहे!!

आ. बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याच्या काही तास आधी मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सनसनाटी आरोप केले. ते म्हणाले की, राज्य सरकारमधील काही मंत्री मराठा समन्वयकांना हाताशी धरून माझ्याविरुद्ध ट्रॅप लावत आहेत. काही मंत्र्यांना फूस लावली जात आहे. काही मराठा नेत्यांना बळ दिले जात आहे. मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेल्या आहेत. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, लातूर, शिर्डी येथे या बैठका झाल्या. आमच्या रॅलीत येऊन आम्हाला कुणी सन्मान देत नाहीत, असा कांगावा करीत बाहेर पडायचे आणि गोंधळ घालायचा हा पहिला ट्रॅप आहे, माझी बदनामी करायची हा दुसरा ट्रॅप आहे, आमच्यावर केसेस टाकून आमच्यावर दबाव आणायचा हा तिसरा ट्रॅप आहे, मुंबईला पोचल्यावर आमच्याकडे दुर्लक्ष करायचे, आम्हाला हीन वागणूक द्यायची हा चौथा ट्रॅप आहे. माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे. आम्हा सर्वांना आरक्षण हवे आहे. पण सरकार माझ्यावर डाव टाकण्याच्या तयारीत आहे. याची मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मीही माहिती घेत आहे. मी जबाबदारीने सांगत आहे. त्यामुळे मराठा समाज सावध आहे. रॅलीत चालत असताना आजूबाजूला लक्षात ठेवा. स्वयंसेवक म्हणून काम करा. कोणी हिंसाचार करतोय का, कुणी जाळपोळ करतोय का? यावर लक्ष ठेवा. कारण घडवून ते आणतील आणि नाव मराठ्यांवर टाकतील.
सरकारवर टीका करताना जरांगे यांनी प्रश्नांचा भडीमार करत म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकारला मराठे का नको? मराठ्यांकडून सत्ता पाहिजे. मग मराठे का नको? तुम्ही आम्हाला मुंबईत का अडवणार? का तुम्ही अंतरवालीसारखा लाठीचार्ज करण्याचा प्रयोग करणार? तुम्ही तपासण्या का लावल्या? बिनतारी संदेश का पाठवले? लोकांचे ट्रॅक्टर का मोजत आहात? इतके दडपण का? रात्री 2 वाजेपर्यंत बैठक का घेतल्या जात आहेत? मराठ्यांना जेरीस आणण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत का? सरकारच्या काही मंत्र्यांना पुढे केले जात आहे. त्यांची नावे माहीत नाहीत. मी त्याबाबत माहिती घेत आहे. रात्रीही सरकारची बैठक झाली. काही जणांचा मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे. काहींनी तर मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचे पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, असे ठरवल्याचे समजते. मराठ्यांना किंमत द्यायची नाही असे ठरवले आहे.ज्यांच्या दुकानदार्‍या बंद पडल्या आहेत त्यांनी आणि सरकारच्या काही मंत्र्यांनी डाव रचले आहेत. त्यांना एकत्र करून मराठ्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायला सांगितली जात आहे. त्यांना वृत्त वाहिन्यांवर डिबेटला पाठवले जाणार आहे. असे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. गुजरातसह इतर राज्यातून फोर्स बोलावला आहे. त्यांना संरक्षणासाठी बोलावले असेल. त्याबाबत माझा काही आरोप नाही. संभाजीनगरला ते आले आहेत. मी खात्रीलायक माहिती घेतल्याशिवाय एखाद्या व्यक्तीबाबत बोलणार नाही. मी शहानिशा करणार आहे. फक्त समाजाने संकटात सोबत राहावे. सरकारने कितीही षड्यंत्र रचले तरी मी हटणार नाही. सरकारसमोर दोनच पर्याय आहेत. एक तर आरक्षण द्या. नाही तर सहा कोटी मराठ्यांच्या कत्तली करा, तरच आम्ही मागे हटू. नाही तर हटणार नाही. एकही मराठा मरायला घाबरणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top