महिला बचत गटांना मिळणार मुंबईत ‘पे अँड पार्क’चे कंत्राट

मुंबई- महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ च्या कंत्राटात महिला बचतगटांना आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांना आरक्षण मिळणार आहे. मुंबईतील कुलाबा आणि ग्रँट रोड परिसरातील चार ठिकाणच्या कंत्राटात हे आरक्षण देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.यातून पालिकेला ३ कोटी ८६ लाख ८८ हजार रुपयांचा महसुल अपेक्षित असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘ए’ पालिका वॉर्डातील कुलाबा परिसरातील नाथाबाई ठाकरसी रोड,जे. एन.हर्डिया मार्ग,वालचंद हिराचंद मार्ग आणि ग्रँट रोड येथील आत्माराम रंगाबनेकर मार्गावरील ‘पे अँड पार्क ‘ ची कंत्राटे महिला बचत गट व सुशिक्षित बेरोजगार संस्थाना दिली जाणार आहेत. ही कंत्राटे दोन वर्षांच्या मदतीसाठी दिली जाणार असून त्यासाठी निविदा भरावी लागणार आहे.हे कंत्राट मिळविण्यासाठी संबंधित महिला बचत गट आणि बेरोजगार संस्था ही पालिकेमध्ये सुवर्ण जयंती नेहरू रोजगार योजनेंतर्गत किंवा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असली पाहिजे,असे पालिकेच्या वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top