मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडताना शिवराज सिंह चौहान भावूक

भोपाळ

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांसाठी असलेले शासकीय निवासस्थान अखेर सोडले. त्यांनी या निवासस्थानी तब्बल साडेसोळा वर्षे वास्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून बाहेर पडताना शिवराज सिंह चौहान भावूक झाले होते. ते आता लींक रोडवरील ७४ बंगला येथील बी ८ या बंगल्यात वास्तव्य करणार आहेत.

चौहान यांनी निवासस्थान सोडण्यापूर्वी तेथील गोशाळेतील गायींचे दर्शन घेतले. निवासस्थानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा त्यांनी निरोप घेतला. यासंदर्भात चौहान यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी आज हे निवासस्थान सोडतो आहे. ते माझ्यासाठी निवासस्थानासोबतच माझी कर्मभूमी देखील होती. आज माझा केवळ पत्ता बदलला आहे. मात्र तुमच्या भावाच्या, तुमच्या मामाच्या घराची दारे तुमच्यासाठी कायमच खुली असतील. माझ्या नव्या निवासस्थानातून माझा जनसेवेचा संकल्प सुरुच राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मामाच्या, भावाच्या मदतीची जेव्हा केव्हा गरज भासेल तेव्हा निसंकोचपणे माझ्या नव्या घरी या. मी तुमची सेवा करण्यापासून मागे हटणार नाही असे वचन देतो.’ दरम्यान, शिवराज चौहान हे २००५ पासून मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यासाठी असलेल्या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. २०२३ च्या निवडणुकीनंतर मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे शिवराज चौहान यांना शासकीय निवासस्थान सोडावे लागले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top