रोहित पवारांच्या विरोधात ‘पेटा’ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई- आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जिवंत खेकड्याला लटकवल्याबद्दल पीपल फॉर एथिकल ट्रिटमेण्ट ऑफ ऍनिमेल्स (पेटा) या प्राणी हक्क संघटनेने निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी, पवार यांनी खेकडा दोऱ्याला टांगून तो गोल फिरवत, खेकडा कर्करोगासारखा आहे आणि भ्रष्टाचाराच्या कर्करोगाला विरोध केलाच पाहिजे, असा दावा केला.
रोहित पवार यांनी केलेला खेकड्याचा वापर पूर्वनियोजित होता, हे व्हिडिओवरून स्पष्ट होते. त्यांनी मीडिया स्टंटसाठी हा वापर करून प्राण्याला अनावश्यक वेदना आणि त्रास दिल्या. पवार यांनी आपल्या कृतीने प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे पेटा इंडियाचे सदस्य शौर्य अग्रवाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मतदान मोहिमेसाठी आणि रॅलीसाठी प्राण्यांचा वापर करून त्यांना मारहाण केली जाते आणि त्यांना घाबरवले जाते. भविष्यात निवडणूक प्रचारात कोणच्याही प्राण्याचा वापर करू नये अशा सूचना सर्व राजकीय पक्षांना देण्याची विनंतीदेखील पेटाने निवडणूक आयोगाला केली आहे. तर देखभाल आणि काळजीसाठी खेकड्याला पशुवैद्यांच्या ताब्यात देण्याची विनंती पेटाने रोहित पवार यांना केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top