लठ्ठपणा ठरवण्यासाठी आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे

  • जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ
    फिजिशियन ऑफ इंडियाचा अहवाल

मुंबई – लठ्ठपणा हा केवळ बीएमआय म्हणजे वजन आणि उंची यांच्या गुणोत्तरावर ठरवला जाऊ शकत नाही. आतापर्यंत त्याच्या आधारावरच उपचार सुचवले जायचे. परंतु आता जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी लठ्ठपणाचा अभ्यास करून लठ्ठपणाची नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यावरील शोधनिबंध नुकताच जर्नल असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. डॉ. निता देशपांडे व डॉ. शशांक शहा यांनी हा अहवाल प्रसिध्द केला.

डॉ. शशांक शाह यांनी सांगितले की, ‘लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे. लठ्ठपणामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. सध्या देशातील लठ्ठपणाचे प्रमाण ४०.३ टक्के इतके आहे. ज्यामध्ये महिला, शहरी लोकसंख्या आणि ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. लठ्ठपणाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी संपूर्ण देशात सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यात भारतातील १००५३१ प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण केले. शारीरिक निष्क्रियता आणि वृध्दत्व यांचा लठ्ठपणाशी अगदी जवळचा संबंध आहे. सामान्यतः वयाच्या ३० वर्षांनंतर स्त्रियांमध्ये ओटीपोटाचा लठ्ठपणा विकसित होतो. ओटीपोटात लठ्ठपणा आणि चयापचय आजार असलेल्या भारतीय लोकसंख्येला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका अधिक आहे. काहीवेळा आहार आणि व्यायाम यांचे नियमित सेवन केल्यानेदेखील लठ्ठपणावर मात करणे शक्य होत नाही. अशावेळी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय ठरतो. वाढत्या लठ्ठपणासोबतच भारतात मधुमेहाचे प्रमाण देखील वाढत आहे. या सर्वाचे मुख्य कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली. २०१९ साली भारतात ७७ दशलक्ष लोकांना मधुमेह झाला असून, आणि २०४५पर्यंत ही संख्या १३४ दशलक्षांपेक्षा जास्त होणार आहे. २०४० पर्यंत भारतातील २० ते ६९ वर्षे वयोगटातील जनतेचे लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होणार आहे.सर्वात जास्त लठ्ठ व्यक्ती दक्षिण भारतात आहेत. तर सर्वात कमी लठ्ठ पूर्व भारतात आहेत.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top