लासलगावात २० कोटींची जलवाहिनी ६ महिन्यांत फुटली

नाशिक – लासलगावसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी २० कोटी रुपये खर्च करून टाकलेली नवीन जलवाहिनी अवघ्या सहा महिन्यांत फुटल्याने लासलगावसह इतर १६ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठीही दोन-तीन दिवसांची वाट बघावी लागत आहे.

लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या सतत पाइपलाइन फुटणे, वीज पुरवठा तोडणे या कारणांमुळे नांदुरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही लासलगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिन्यातून तीन ते चार वेळा गावाला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.नवीन पाइपलाइनसाठी २० कोटी रुपये खर्च करून योजना सहा महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात सुरू झाली. मात्र पुन्हा नवीन आणि जुनी पाइपलाइन फुटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या सततच्या गळतीमुळे पाणीपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. या भीषण पाणीटंचाईने लासलगाव परिसरात टँकर, खासगी बोअरवेल, महिलांच्या डोक्यावर हांडे या प्रकारचे चित्र आता सर्वत्र बघावयास मिळत आहे. प्रशासनाने यात वेळीच गांभीर्याने लक्ष घालून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top