वाशीमध्ये १८ श्रीगुरूंच्या पादुका उत्सव सोहळ्याचे आयोजन

नवी मुंबई

वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील लाखो भाविकांना १८ श्रीगुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्याची संधी ‘संकल्प ते सिद्धी’ सोहळ्यानिमित्त उपलब्ध झाली आहे. आज आणि उद्या सकाळी १०.३० ते रात्री ९.३० या वेळेत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने पादुका दर्शन सोहळा होत आहे. या सोहळ्यात आध्यात्मिक गुरू श्री एम मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ५००० भाविक एकाच वेळी अग्निहोत्र करणार आहेत. सोबतच ओंकार जप आणि धुनी प्रज्वलन होणार आहे. त्यासाठी श्रीगुरू पादुका मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात आज प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा भक्तिगीतांचा संगीत सोहळा , तर उद्या गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचा संगीत सोहळा आयोजित केला आहे. नागरिकांना विनामूल्य पादुका दर्शन सोहळ्याला हजेरी लावता येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज (नेवासा), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव महाराज (घुमान), संत जनाबाई (गंगाखेड), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत सेना महाराज (पंढरपूर), संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर), श्रीगुरू महाअवतार बाबाजी (सौजन्य – श्री एम), श्री रामदास स्वामी (सज्जनगड), श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), श्री साईबाबा (शिर्डी), श्री टेंबे स्वामी महाराज (माणगाव), श्री गजानन महाराज (शेगांव), परमसद्‌गुरू गजानन महाराज (शिवपुरी), संत वेणाबाई (मिरज), श्री शंकर महाराज (धनकवडी), श्री गुळवणी महाराज (पुणे) आणि श्रीगुरू बालाजी तांबे (कार्ला) यांच्या पादुकांचा आशीर्वाद या सोहळ्यात घेता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top