विरोधकांचा पराभव हिच त्यांना शिक्षा मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

रामटेक – एनडीए सरकारच्या काळात गेल्या 10 वर्षांत झालेला विकास हा एक ट्रेलर होता. पण पिक्चर अजून बाकी आहे. पुढील पाच वर्षांत देशाला खूप पुढे न्यायचे आहे. कारण जनतेचे स्वप्न हाच मोदींचा संकल्प आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षांत ज्यांनी देशाला, इथल्या जनतेला, विकासापासून वंचित ठेवले. त्यांना या निवडणुकीत एकही जागा मिळणार नाही, असे ठरवून मतदान करा. हिच त्यांना शिक्षा असेल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी रामटेकमधील सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी देशाचे संविधान बदलणार अशी अफवा पसरवणार्‍या लोकांनी, बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशभर का लागू केले नाही? असा थेट सवाल त्यांनी काँग्रेसला केला.
आज रामटेक मतदारसंघातील कन्हान येथे नागपूर, रामटेक आणि भांडार-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा झाली. मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, विरोधक जेव्हा मला आणि माझ्या आईवडिलांना शिव्या देतात तेव्हा, समजायचे आपला विजय निश्चित आहे. मोदी तिसर्‍यांदा निवडून आले तर संविधान बदलतील, लोकशाही धोक्यात येईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पण त्यांची ही टेप जुनीच आहे. अटलजींचे सरकार होते तेव्हाही ते हेच सांगत होते, आणि आताही तेच सांगत आहेत. पण गेल्या 75 वर्षांत संविधानात अनेक वेळा या लोकांनी बदल केले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का? असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, संविधानाची इतकी चिंता आहे तर संपूर्ण देशात ते लागू का करत नाही. आम्ही काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत संविधान लागू केले. काश्मीरमध्ये 370 कलम होते. त्यामुळे तिथल्या गोरगरीब जनतेला त्यांचा न्याय हक्क मिळत नव्हता. दलित मागासवर्गीयांना आरक्षण मिळत नव्हते. आम्ही 370 कलम रद्द करून तिथल्या जनतेला संविधानाने दिलेले न्याय हक्क मिळवून दिले. आज त्याबाबत काँग्रेस अध्यक्ष चुकीची माहिती पसरवत आहेत. दलित ओबीसींना आमच्या सरकारने न्याय दिला. आम्ही ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. आदिवासींसाठी मंत्रालय बनवले. आदिवासींचा बजेट 5 टक्क्यांनी वाढवला. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले. मात्र काँग्रेसने गेल्या 75 वर्षांत दलित मागासवर्गीयांना विकासापासून वंचित ठेवले, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. गेल्या 10 वर्षांत आम्ही गरिबांना पक्की घरे दिली. मोफत रेशन दिले. मोफत आरोग्यसेवा दिली. महिला आणि शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवल्या. या विदर्भाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, काँग्रेसने विदर्भासाठी महत्त्वपूर्ण असलेला गोसीखुर्द प्रकल्प रखडवला होता. इथे महायुतीचे सरकार आल्यावर त्या प्रकल्पावर आता युद्धपातळीवर काम सुरू आहे. इथे आम्ही मेट्रो आणली. विदर्भात अनेक विकास प्रकल्प सुरू केले. 500 वर्षांपासून रखडलेला राम मंदिराचा प्रश्न आम्ही सोडवला आणि म्हणूनच आज जे लोक सनातन धर्माला विरोध करीत आहेत, जे लोक नारीशक्तीचा अपमान करीत आहेत, अशांना त्यांची जागा दाखवून द्या. ज्या लोकांनी बाबासाहेबांना भारतरत्न देण्यापासून वंचित ठेवले. दलित आदिवासींचा विकास रोखला, त्यांचा पराभव करणे हीच त्यांना शिक्षा असेल, असेही मोदींनी सांगितले. या सभेत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी यांचीही भाषणे झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top