व्हिपवर तारीखच नाही शिंदे गटाचा दावा

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाच्या वेळी शिंदे गटाच्या आमदारांना विधिमंडळ बैठकीला बोलावण्यासाठी जो व्हिप बजावल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने केला जात आहे, तसा कोणताही व्हिप बजावण्यात आला नाही. व्हिपवर तारीख नाही. व्हिप बजावल्याचा कोणताही पुरावा ठाकरे गटाला सादर करता आलेला नाही, असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी केला. दरम्यान, आज सुनावणीआधी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी विधान भवनाला पत्र लिहीत विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत असल्याची तक्रार केली.
16 आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे तत्कालीन प्रतोद सुनील प्रभू यांची आज सलग तिसर्‍या दिवशी साक्ष, फेरसाक्ष घेण्याचे काम सुरू होते. आजच्या सुनावणीतही प्रभू यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सोडली नाही. ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामत यांनी युक्‍तिवाद केला. व्हिपची तारीख, जावक क्रमांक आणि त्यावरील सही यातील तांत्रिक मुद्दे काढत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रभू यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सुनील प्रभू जो व्हिप बजावल्याचे सांगत आहेत, त्या मूळ प्रतीवर हाताने तारीख लिहिलेली होती तर झेरॉक्स प्रतीत तारीखच दिसत नाही. प्रभूंनी व्हिपबाबत खोटी कागदपत्रे सादर केली. मूळ कागदपत्रांमध्ये छेडछाड केली, असा आरोप महेश जेठमलानी यांनी केला. कार्यालयीन कर्मचारी मनोज चौगुले यांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आमदारांना व्हिप बजावला, अशी माहिती सुनील प्रभूंनी दिली. त्यावर तो व्हिप सर्व आमदारांना पोहोचला की नाही याची खातरजमा तुम्ही केली होती का, असा प्रतिप्रश्‍न जेठमलानींनी केला. त्यावर मी त्यांना पाठवायला सांगितले होते, असे उत्तर प्रभूंनी दिले. मग तुम्ही चौगुलेंना साक्षीदार का केले नाही? त्यांचा फोन सादर का केला नाही? कारण तुम्ही खोटे बोलत आहात. तुम्ही कोणता मेसेज पाठवलाच नव्हता. खातरजमा केली नाही तर व्हिपचे उल्लंघन झाले हा दावा कसा करता, असा सवाल जेठमलानींनी केला.
सुनावणीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की व्हिप बनावट होता हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. आम्हाला कोणाला तो पोहोचलाच नाही. मलाही व्हिप मिळालेला नाही. खुलासा करताना आता त्याची चर्चा होत आहे. व्हिप बजावला म्हणणार्‍यांनी पुरावे म्हणून काही दाखल केले नाही. व्हिप पाठवला असे म्हणतात त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही.
दरम्यान, आज सकाळी सुनावणीआधी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानभवनाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. अध्यक्ष पक्षपातीपणा, वेळकाढूपणा करत आहेत अशी तक्रार प्रभूंनी केली. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारे पत्र प्रभूंनी विधान भवनाला लिहिले आहे. अध्यक्ष शिंदे गटाला झुकते माप देत आहेत, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवत आहेत, अशी तक्रार या पत्रात
केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top