श्रीगोंदाच्या सुद्रिकेश्वर मंदिरातील ४० किलोंचे चांदीचे सिंहासन चोरीला

अहमदनगर- अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील श्री सुद्रिकेश्वर महाराजांचे ४० किलो वजनाचे चांदीचे सिंहासन चोरले. या सिंहासनाची किंमत जवळपास ३० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
श्रीगोंदा येथील अमित बगाडे हे पहाटे मंदिरात आले तेव्हा चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ मंदिराचे पुजारी रमेश धुमाळ आणि ग्रामस्थांना या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन चोर मंदिरासमोर आले. त्यांनी आपल्या जवळील कटावणीने मंदिराचे कुलूप तोडले आणि मंदिरात प्रवेश करून सिंहासनाची चोरी केली, असे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरु आहे.
मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ काल दिवसभर गाव बंद ठेवण्यात आले होते. गावाची सुद्रिकेश्वर महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे. पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थांनी जवळपास ७ कोटी रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. ५० वर्षांपूर्वी सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा कळस देखील चोरीला गेला होता. त्यानंतर चोरीची ही दुसरी घटना आहे. संबंधित चोरट्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top