सगेसोयऱ्याला पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावरच जरांगेंचा विजयोत्सव

जालना- सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आणि सरकारने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा आंदोलन सुरुच राहणार आहे. सगेसोयऱ्याला पहिले प्रमाणपत्र मिळाले की, विजयी कार्यक्रमाचे आयोजन करू, अशी घोषणा आज मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. ते अंतरवाली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांशी बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. मंगळवार 30 जानेवारीला जरांगे रायगडावर जाऊन गुलाल उधळणार आहेत. 31 जानेवारीला ते त्यांच्या घरी जाणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या विजयी लढ्यानंतर काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे-पाटील अंतरवालीमध्ये आले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी परिसरातील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानंतर जरांगेंनी सभा घेत गावकऱ्यांशी संवाद साधला. कालच्या विजयानंतर आज मनोज जरांगे यांनी सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी अंतरवालीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीवेळी जरांगे यांनी सांगितले की, सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सरकारने काल अध्यादेश काढला. ज्याची कुणबी म्हणून नोंद मिळाली, त्याच्या नोंदीच्या आधारावर सोयऱ्याला एकतरी प्रमाणपत्र मिळाले की, मगच विजय उत्सव साजरा होईल. हे प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपले हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
मुंबईला गेलो कायदा झाला. राज्यभर फिरलो 54 लाख नोंदी मिळाल्या. कोणताही कार्यक्रम घेतल्यावर समाजाचा फायदा झाला पाहिजे यावरच माझा भर आहे. जरांगे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, प्रमाणपत्र काढताना अडचणी येतील. त्या सोडवण्यासाठी तर जिल्हावार 11 जणांच्या समितीची नेमणूक करा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिन्यासाठी मदत केंद्राची स्थापना करा. गोरगरिबांना प्रमाणपत्रासाठी ज्या अडचणी येत आहेत, त्या अडचणी सोडविण्याचे काम या मदत केंद्राने करायचे आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती त्यांचे काम करत आहे. आपण देखील आपल्या वतीने त्यांच्यासोबत काम करू. देवस्थानात विविध पुजांवेळी माहिती लिहून घेताना जातदेखील लिहिली जायची. ते पुरावे पुरोहितांकडे आहेत का, याचा शोध घ्या. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. याचा सगेसोयऱ्यांना फायदा झाला पाहिजे. गाफिल राहिले तर आंदोलन फसते. आपण सावध आहोत. सरकारने कायदा केला, पण त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण सावध राहायचे आहे. विजय अजून दहा फुटावर आहे. पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खरा गुलाल उधळू, विजय साजरा करू. सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघणे खूप महत्त्वाचे होते, असे राजपत्र क्वचितच निघते. याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. ते होईपर्यंत आपण सावध राहायचे आहे. आरक्षण मिळाल्यावर रायगडला जाईल असे म्हटले होते. उद्या मी रायगडावर जाणार आहे. एक दिवस रायगडावर जायला लागेल. 30 जानेवारीला सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर 31 जानेवारी रोजी घरी जाणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top