सलमान खानच्या घरावर पहाटे गोळीबार हा शेवटचा इशारा! आमची ताकद समजली का?

मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी पाच गोळ्या सलमानच्या घराच्या दिशेने झाडल्या. त्यातील एक गोळी सलमानच्या घराच्या गॅलरीमध्ये घुसली. गोळीबार झाला तेव्हा सलमान घरातच होता, असे सांगण्यात आले. त्यानंतर काही तासातच बिश्नोईने व्हॉट्सअ‍ॅपवर सलमानला धमकी देत हा केवळ इशारा आहे, आमची ताकद दाखवली, आम्हाला कमी लेखू नको असे म्हटले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दोन दुचाकीवरून आल्याचे दिसले. मात्र त्यांचे चेहरे हेल्मेटने झाकलेले होते. हा हल्ला लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचा अंदाज आहे. हल्ल्यानंतर काही वेळाने फेसबुकवर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा हल्ला लॉरेन्स बिश्नोई टोळीनेच केल्याचा दावा केला. त्याने म्हटले की सलमान तुला हा शेवटचा इशारा आहे, आमची ताकद तुला समजली का? मात्र हा हल्ला बिश्नोई गँगनेच केला याबद्दल पोलीस साशंक आहेत.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानने चिंकारा हरणांची शिकार केल्यावरून बिश्नोई समाज सलमान खानवर संतापला आहे. तेव्हापासून सलमान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आहे असे बोलले जाते. लॉरेन्स बिष्णोई तुरुंगात असला तरी त्याची गँग सक्रिय आहे. सलमानच्या घरावर गोळीबार झाल्याचे वृत्त कळताच सरकार आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून संपर्क साधून त्याची विचारपूस केली. तर मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. मुंबई पोलिसांतील चकमक फेम अधिकारी दया नायक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दिल्ली पोलिसांचे एक पथकही तातडीने मुंबईत दाखल झाले. गोळीबाराच्या घटनेनंतर तत्काळ सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणी तपास करीत आहे. तपासादरम्यान पोलिसांना सलमानच्या घराच्या बाहेरील भिंतीवर एक आणि गॅलरीतील भिंतीवर एका गोळीची खूण आढळली आहे. सलमानला वाय प्लस सुरक्षा असताना हा प्रकार घडला हे विशेष आहे. पोलिसांनी शोध सुरू केल्यावर काही तासात एका हल्लेखोराने वापरलेली दुचाकी जवळच माऊंट मेरी चर्च पाशी सापडली.
ज्या बंदुकीमधून गोळ्या झाडण्यात आल्या ती 7.6 बोअरची बंदूक होती. फोरेन्सिक एक्सपर्टनी हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी जप्त केली असून त्यासंदर्भात तपास सुरू आहे. हल्लेखोर महाराष्ट्राबाहेरचे असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
फेसबुकवर जी पोस्ट व्हायरल झाली ती खरी आहे की खोटी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. या पोस्टमध्ये सलमानला धमकावण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की ‘जुर्म के खिलाफ फैसला अगर जंग से हो तो जंग ही सही. सलमान खान हमने यह तुम्हे सिर्फ ट्रेलर दिखाने के लिए किया है. ताकी तुम समझ जाओ हमारी ताकत को। हमे और मत परखो । यह पहली और आखरी वॉर्निंग है। इसके बाद गोलिया खाली घर पर नही चलेगी। जिस दाऊद इब्राहीम और छोटा शकील को तुमने भगवान मान रखा है उनके नाम के दो कुत्ते हमने पाले है। बाकी ज्यादा बोलने की मुझे आदत नही है’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी नुकतीच सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top