हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

रांची

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास रांचीच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला. सोरेन यांच्या काकांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने आज सुनावणीवेळी त्यांची मागणी फेटाळण्यात आली.

हेमंत सोरेन यांचे काका तथा झारखंड मुक्ती मोर्चा प्रमुख शिबू सोरेन यांचे भाऊ राम सोरेन यांचे आज सकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. ते रांचीमध्येच राहत होते. हेमंत सोरेन यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे १३ दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. यावर आज रांचीच्या विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. दरम्यान,हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ते सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने ईडीला सोरेन यांच्या जामीन याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी एक आठवड्याची मुदत दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top