Home / News / Gokul Milk Union Halal Certification Sparks Political Row in Kolhapur : गोकुळच्या उत्पादनाला हलाल प्रमाणपत्र ! निवडणुकीचा खेळ

Gokul Milk Union Halal Certification Sparks Political Row in Kolhapur : गोकुळच्या उत्पादनाला हलाल प्रमाणपत्र ! निवडणुकीचा खेळ

Gokul Milk Union Halal Certification Sparks Political Row in Kolhapur – कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या दूध, तूप, लोणी या उत्पादनांसाठी...

By: Team Navakal
Gokul Milk Union Halal Certification Sparks Political Row in Kolhapur
Social + WhatsApp CTA


Gokul Milk Union Halal Certification Sparks Political Row in Kolhapur – कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या दूध, तूप, लोणी या उत्पादनांसाठी हलाल सर्टिफिकेट घेण्यात आले असे उघड झाले आणि नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोल्हापूरचे महत्त्वाचे नेते हसन मुश्रीफ यांचा पुत्र अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट घेण्यात आले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजताच हा शोध जाहीर करून मुश्रीफ यांच्या बदनामीचे निवडणुकीचे राजकारण सुरू झाले आहे.


या हलाल प्रमाणपत्राशिवाय आखाती देशात आणि परदेशातील इतर काही देशांत उत्पादने निर्यात करता येत नाहीत. त्यामुळे व्यावहारिक कारणांसाठी हे प्रमाणपत्र घेतले हे स्पष्ट असताना हा मुद्दा उचलून राजकारण केले जात आहे, असे जाणकार सांगतात.
शुद्ध शाकाहारी असलेल्या दुग्धजन्य उत्पादनांना हलाल प्रमाणपत्राची गरज काय, असा संतप्त सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे, असे वातावरण निर्माण केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे.


गोकुळ दूध संघाच्या दूध, तूप, लोणी (बटर) आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी मुंबईस्थित ‌‘ज्युहफ सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड‌’ (जमिअत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट) या संस्थेकडून हलाल मुक्त प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. या सर्टिफिकेटची वैधता 18 मार्च 2028 पर्यंत आहे. हा निर्णय महायुती सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असताना घेण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यातून या प्रकरणाला आता राजकीय रंग चढवला आहे. गोकुळ दूध संघ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यावसायिक स्पष्टीकरण देत विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. गोकुळ प्रशासनाने एक परिपत्रक काढत म्हटले आहे की, हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचाराशी संबंधित नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असलेले केवळ एक तांत्रिक व गुणवत्ता मानक आहे.

गोकुळचे तूप, लोणी आणि दूध पावडर ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर अझरबैजान, सौदी अरेबिया, युएई, ओमान, कतार, कुवेत, तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि बांगलादेश या आखाती (गल्फ) व इतर इस्लामिक देशांमध्ये निर्यात केली जातात या देशांच्या अधिकृत व्यापार नियमांनुसार ‌‘हलाल प्रमाणपत्र‌’ असल्याशिवाय तिथे कोणत्याही अन्नपदार्थांच्या आयातीला परवानगी मिळत नाही. हे भारतातील एफएसएसआय किंवा आयएसओ प्रमाणपत्रासारखेच एक व्यावसायिक मानक असून, उत्पादनात कोणतेही प्रतिबंधित किंवा मांसयुक्त घटक वापरलेले नाहीत, याची ती केवळ तांत्रिक खात्री असते.

देशातील ‌‘अमुल‌’ आणि ‌‘मदर डेअरी‌’नेही हे मानक स्वीकारले आहे. परदेशी निर्यात वाढल्यामुळे संघाला परकीय चलन मिळते, ज्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यात होतो. या संपूर्ण विषयाकडे धार्मिक नव्हे तर आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
या प्रकरणी नाव आल्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विरोधकांचा समाचार घेताना म्हणाले की, हा निर्णय नवीन नसून 2022 सालापासून हे प्रमाणपत्र अस्तित्वात आहे. नाविद मुश्रीफ तर आताच चेअरमन झाले. सध्या गोकुळच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे, ज्यांच्याकडे काही काम उरलेले नाही ते विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी मुद्दाम हा जुना विषय उकरून काढत आहेत.


गोकुळच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी करणारे प्रतिस्पर्धी प्रकाश बेलावडे यांनी गोकुळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर हलाल सर्टिफिकेटवरून टीका केली आहे. ते म्हणाले की, संविधानात हलाल सर्टिफिकेटला मान्यता आहे का? संविधानात मान्यता नसताना ते घेण्याची गरज होती का?आतापर्यंत साठ वर्षांत त्याची गरज लागली नव्हती. मग आताच ते का घेण्यात आले? त्याचा प्रस्ताव कुणी मांडला? त्यासाठी खर्च कुणी केला? हे जनतेला विचारून केले का? सत्तेत राजकारणात धर्म आणायचा नाही म्हणता. मग हे चालते का? गरज नसताना हे हलाल सर्टिफिकेट घेण्यात आलेले आहे. गोकुळचे कुठलेच उत्पादन आखाती देशात जात नाही.
हलाल म्हणजे काय?


‌‘हलाल‌’ ही इस्लाम धर्मातील संकल्पना असून, इस्लामच्या नियमांनुसार मान्य किंवा ग्राह्य असलेल्या गोष्टींना ‌‘हलाल‌’ म्हटले जाते. खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यप्रसाधने किंवा इतर उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेले घटक आणि उत्पादन प्रक्रिया इस्लामिक निकषांनुसार असल्यास संबंधित संस्थांकडून ‌‘हलाल सर्टिफिकेट‌’ दिले जाते. काही कंपन्या मुस्लीम ग्राहकांचा आणि बाजारपेठेचा विचार करून किंवा निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र घेतात.


Web Title:
संबंधित बातम्या