Maharashtra Epstein Files: नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने काही महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला होता. आता हेच गंभीर प्रकरण मोठ्या पडद्यावर येत असून, त्यावरून थेट राजकीय आणि नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत या विषयावर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. मात्र, या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आपल्याला फोनवरून धमक्या येत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
“चित्रपटात काम करू नको, नाहीतर तुझे राजकीय करिअर संपवून टाकू,” अशा शब्दांत काही महिला नेत्यांनी आपल्याला फोन करून दबाव आणल्याचे दीपाली सय्यद यांनी उघड केले आहे.
Maharashtra Epstein Files: मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार
दीपाली सय्यद यांनी या दबावाला बळी पडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली “अभिनय हे माझे प्रोफेशन आहे आणि मी कोणाची परवानगी घेऊन काम करत नाही. मला काही धमक्यांचे फोन आले आहेत, पण मी अशा प्रेशरला अजिबात घाबरत नाही,” असे दीपाली सय्यद यांनी ठणकावून सांगितले.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत दीपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत. आपल्याला कोणाकोणाचे फोन आले, याचा संपूर्ण खुलासा त्या पक्षश्रेष्ठींसमोर करणार आहेत.
“मी 4 महिने बिग बॉसच्या घरात होते, त्यामुळे बाहेर खरात प्रकरणात नेमके काय घडले याची मला पूर्ण कल्पना नव्हती. कालच मला या सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली आणि ते वाचून मला या प्रकरणाचे गांभीर्य समजले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Epstein Files: रूपाली चाकणकरांची भूमिका साकारणार? सस्पेन्स कायम
या चित्रपटात दीपाली सय्यद या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच भूमिकेमुळे त्यांना राजकीय क्षेत्रातून विरोध होत असल्याचे बोलले जात आहे.
आपला नेमका रोल कोणता आहे, हे दीपाली सय्यद यांनी अजून गुपित ठेवले आहे. “मी चित्रपटात कोणाचा रोल करतेय हे आताच सांगणार नाही, ते तुम्हाला नंतर समजेलच. रूपाली चाकणकर यांची या प्रकरणात काय भूमिका होती किंवा त्यांची काही चूक होती का, हे मला पूर्ण स्क्रिप्ट वाचल्यावरच समजू शकेल,” असे त्यांनी सांगितले.
Maharashtra Epstein Files: २ ऑक्टोबरला सत्य बाहेर येणार; अनेकांचे मुखवटे गळणार?
अशोक खरात हा लोकांना कसले तरी आकडे सांगायचा, कसले तरी पदार्थ प्यायला द्यायचा. असे लोक गुरू कसे असू शकतात, असा सवाल करत दीपाली सय्यद यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक ओळखण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या प्रकरणात अनेक बड्या लोकांचे कनेक्शन असल्याचा संशय आहे.
‘आता सगळं उघड होणार…!’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात सुरू होत असून, हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानंतर समाजातील आणि राजकारणातील अनेक ‘सभ्य’ चेहऱ्यांचे खरे मुखवटे गळून पडतील, असे संकेत मिळत आहेत.
हे देखील वाचा – Vaibhav Sooryavanshi IPL Record: 15 वर्षांच्या पोराचा धमाका! ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडत वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास










