Loan Denied to Ajit Pawar’s Sugar Factory – केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) ने महाराष्ट्रातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या 14 पैकी सात सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. यात अजित पवार यांच्या साखर कारखान्याला कर्ज दिलेले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीत रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करा, असे भाषण केले. हा पाठिंबा देण्यासाठी ते बारामतीला धावले होते. त्याचवेळी अजित पवारांच्या कारखान्याला आर्थिक मदत नाकारली. या भाजपाच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे.
राज्य सरकारने एकूण 14 कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव एनसीडीसीकडे पाठवला होता. यापैकी फक्त 7 कारखान्यांना कर्ज मंजूर झाले. उर्वरित 7 कारखान्यांचे प्रस्ताव विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आले. यामध्ये दिवंगत अजित पवार यांच्याशी संबंधित इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 361.41 कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावाला नकार देण्यात आला आहे.
भाजपात असलेले पृथ्वीराज जाचक आणि अजित पवार समर्थकांनी एकत्र पॅनल करून निवडणूक लढवत हा कारखाना ताब्यात घेतला होता. मात्र, कारखान्याला कर्ज नाकारण्यात आले. त्याचबरोबर काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याशी संबंधित राजगड सहकारी साखर कारखान्याचा तब्बल 467.85 कोटी रुपयांचा प्रस्तावही फेटाळण्यात आला आहे. पक्षांतर करूनही कर्ज न मिळाल्याने थोपटे यांची राजकीय कोंडी झाल्याची चर्चा आहे.
जालना येथील भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 106.08 कोटींचा प्रस्तावही फेटाळण्यात आला. हा दानवे यांना धक्का आहे. धाराशिव येथील काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांचा श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना (72 कोटी), सोलापूरमधील धर्मराज काडादी यांचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (199.94 कोटी), अहिल्यानगरमधील शरद पवार गटाचे राहुल जगताप यांचा कुकडी सहकारी साखर कारखाना (49.85 कोटी) आणि पुण्यातील शिरूरचे माजी आमदार शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्या ताब्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना (184.12 कोटी) यांचे कर्ज नामंजूर केले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, एनसीडीसीने काही त्रुटी काढल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करून आम्ही एनसीडीसीकडे पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवू. त्यानंतर आम्हाला कर्ज मंजूर होईल, असा विश्वास आहे.
काही नेत्यांना या कर्जवाटपात दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरमधील श्री भोगावती, दुधगंगा-वेदगंगा आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर झाले असून वारणा कारखाना विनय कोरे यांचा आहे. सांगलीतील क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्यालाही कर्ज मंजूर झाले असून हा कारखाना विधान परिषद आमदार अरुण लाड यांच्या कुटुंबाचा आहे. अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय अहिल्यानगरमधील मुळा सहकारी साखर कारखाना, सातार्यातील शिवेंद्रराजे भोसले यांचा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि बीडमधील माजी आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यालाही कर्ज मंजुरी मिळाली आहे.
कर्जाचे प्रस्ताव नामंजूर करताना कारणे देण्यात आली आहेत. संबंधित कारखान्यांचे भागभांडवल कमी असणे, आर्थिक अनियमितता, कारखाना सलग तीन वर्षे तोट्यात असणे, कर्ज परतफेडीचे अत्यल्प प्रमाण, यापूर्वी घेतलेल्या कर्जातून कोणतीही सुधारणा न होणे, तसेच काही कारखाने भाड्याने चालवायला दिले जाणे या बाबींचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय एफआरपीची थकबाकी आणि शासनाचे देणे बाकी असणे, हेही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. मात्र ही कारणे जवळजवळ सर्वच कर्जबाजारी कारखान्यांना लागू होतात. त्यामुळे मदत देण्याचा निर्णय हा राजकीय दृष्टीनेच होतो.
याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जे साखर कारखाने चालू राहू शकतात, नफ्यात येऊ शकतात आणि शेतकर्यांना न्याय देऊ शकतात अशाच कारखान्यांना मदत करणे ही सरकारची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे. गेल्या 40 वर्षांपासून सरकारने याच धोरणानुसार निर्णय घेतले आहेत. बाजारात कारखान्यांची संख्या जास्त असणे हे शेतकर्यांच्या दृष्टीने फायदेशीर असते. कारण कारखाने कमी झाले तर मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकर्यांना अधिक पर्याय उपलब्ध राहावेत, स्पर्धा वाढावी आणि त्यांना योग्य दर मिळावा, यासाठीच सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत असते. अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत करणे ही नवीन बाब नाही. यापूर्वीही अनेक वेळा सरकारने अशा कारखान्यांना आर्थिक मदत केली असून हा निर्णयही त्याच धोरणाचा भाग आहे.










