Maharashtra FDA Rules : तुम्ही हॉटेलमध्ये आवडीने पनीरची भाजी किंवा चीज पिझ्झा खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि पॅकेज्ड फूड विक्रेत्यांना आता ते ग्राहकांना नक्की काय वाढत आहेत, याची स्पष्ट माहिती द्यावी लागणार आहे.
मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, 1 मे पासून याची कडक अंमलबजावणी सुरू होणार आहे.
काय आहे ‘चीज किंवा पनीर अॅनालॉग’?
अनेकदा पनीर किंवा चीजसारखे दिसणारे पदार्थ तयार करण्यासाठी दुधाऐवजी खाद्यतेल, स्टार्च आणि इतर काही घटकांचा वापर केला जातो. याला तांत्रिक भाषेत ‘अॅनालॉग’ (Analogue) असे म्हणतात. हे पदार्थ दिसायला आणि चवीला पनीरसारखेच असले, तरी त्यांचे पोषणमूल्य मात्र दुधापासून बनवलेल्या अस्सल पनीरपेक्षा पूर्णपणे वेगळे असते.
एफडीएने स्पष्ट केले आहे की हे पदार्थ खाण्यासाठी असुरक्षित नाहीत, मात्र पनीरच्या नावाखाली हे पदार्थ विकणे म्हणजे ग्राहकांची दिशाभूल आहे.
मेनू कार्ड आणि बिलावर द्यावी लागणार माहिती
रिपोर्टनुसार आता सर्व हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट-फूड साखळींना त्यांच्या मेनू कार्डवर, डिस्प्ले बोर्डवर आणि बिलावर स्पष्टपणे ‘चीज अॅनालॉग’ किंवा ‘डेअरी अॅनालॉग’ असा उल्लेख करावा लागेल. जर एखाद्या डिशमध्ये अस्सल पनीरऐवजी पर्यायी पदार्थ वापरला असेल, तर ग्राहकाला त्याबद्दल आधीच माहिती असणे कायद्याने बंधनकारक आहे.
का घेतला हा निर्णय?
गेल्या काही काळापासून ग्राहकांकडून अनेक तक्रारी येत होत्या की, पनीरच्या नावाखाली त्यांना स्वस्त दर्जाचे पर्यायी पदार्थ दिले जात आहेत. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 च्या कलम 18(2)(e) नुसार, प्रत्येक ग्राहकाला आपण काय खात आहोत हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
नियम मोडल्यास होणार कडक कारवाई
हा नियम केवळ हॉटेलपुरता मर्यादित नसून पॅकेज्ड फूड उत्पादकांनाही लागू असेल. जर उत्पादनामध्ये दुधाचा वापर नसेल, तर त्यावर ‘पनीर’ किंवा ‘चीज’ असे लेबल लावता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये उत्पादक, पुरवठादार आणि किरकोळ विक्रेते अशा सर्वांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
प्रशासनाने ग्राहकांनाही आवाहन केले आहे की, पॅकेज्ड फूड खरेदी करताना त्यावरील लेबल नीट तपासावे आणि हॉटेलमध्ये खाताना ‘अॅनालॉग’ शब्दाचा उल्लेख आहे का, याची खात्री करावी.
हे देखील वाचा –










