Woman Rebukes Minister Mahajan during narishakti morcha ! Video Viral – संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी भाजपाने काल मुंबईत वरळी भागात आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात एका महिलेमुळेच मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अपमानित होण्याचा प्रसंग ओढवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण महिलेचे समर्थन करत आहेत.
राज्य भाजपाच्या वतीने जांबोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे वरळी परिसरात वाहतूक जवळजवळ तासभर ठप्प झाली होती. त्यावेळी ही महिला आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघाली होती. मात्र वाहतूक थांबवल्याने रखडपट्टी झाली. त्यामुळे महिला संतप्त झाली. मोर्चाचे नेतृत्व करणारे जलसंपदा मंत्री महाजन यांच्यापर्यंत ती पोहोचली आणि तिने वाहतूक का अडवली याचा जाब महाजन यांनाच विचारला. तिच्या संतापामुळे तिचा आवाज चढला होता.
महिलेचा रुद्रावतार पाहून महाजन गडबडून गेले. त्यांनी महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ती काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हती. ती म्हणत होती की, शेजारी मोकळे मैदान आहे तिथे जाऊन निदर्शने करा, इथे रस्ता का अडवून ठेवला आहे. इथून चालते व्हा, असे ती सरळ महाजनांना म्हणाली. तिला रोखू पाहणार्या पोलीस अधिकार्यावरही ती बरसली, तुम्ही गप्प बसा, आधी या लोकांना इथून हाकला आणि वाहतूक सुरळीत करा, माझ्या मुलाला मला आणायचे आहे, मी कुणाशीही बोलणार नाही, या मोर्चाला परवानगी का दिली, शेजारी मैदानात का जात नाही, असा दम तिने भरला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक नेटकर्यांनी त्या महिलेची बाजू उचलून धरली आहे. काल घडलेल्या या घटनेबद्दल आज माध्यमांसमोर येऊन गिरीश महाजन यांनी मात्र प्रतिक्रिया देत त्या महिलेलाच दोषी ठरवले. ते म्हणाले की, महिलांच्या हितासाठीच कालचा मोर्चा होता. हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली हे खरे आहे. पण प्रत्येक मोर्चाच्या वेळी असे होतेच. आम्ही मोर्चासाठी रितसर परवानगी घेतली होती.
पण त्या महिल्या भयंकर संतापल्या होत्या. वाट्टेल तसे बोलत होत्या. त्यांनी पोलिसांशीदेखील हुज्जत घातली. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आमच्या महिला कार्यकर्त्याही संतापल्या होत्या. पण आम्ही त्यांना शांत रहायला सांगितले. त्यांना त्रास सहन करावा लागला हे मान्य आहे. पण म्हणून अशा असंसदीय भाषेत बोलणे योग्य नाही. त्यांना आपले म्हणणे दुसर्या शब्दात मांडता आले असते. पण रागाच्या भरात त्यांना भान राहिले नाही. यापुढे आम्ही काळजी घेऊ. त्यांनी पोलिसांत तक्रार करायला हवी होती, पण त्यांनी इथे अयोग्य वर्तणूक केली.










