राज्यात पावसाची संततधार कायमविदर्भात पूरस्थिती! कोकणात विश्रांती

मुंबई – राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आजही कायम होती. मुंबई, विदर्भासह राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईत पावसामुळे रस्ते वाहतूक संथ झाली, तर पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपगनगरीय रेल्वे गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. कोकणात आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली. तर विदर्भातील पूरस्थिती अधिकच धोकादायक पातळीवर पोहोचली.विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. विदर्भातील शाळा व महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. तर नागपूर-भंडारा, नागपूर-गडचिरोली हे प्रमुख मार्ग बंद झाले. भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखनपूर तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली केली त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जिल्ह्यातील इतरही अनेक मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल गावात उमा नदीचे पाणी शिरले. त्यामुळे घरे व शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. वर्धा जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. पावसामुळे कारंजा-माणिकवाडा मार्ग सहा तासांपेक्षा अधिक काळ बंद राहिला.कोल्हापूरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. कोल्हापुरात पावसाचा जोर कमी असला तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. कोल्हापुरातील पावसाने राधानगरी धरण ८० टक्के भरले असून स्वयंचलीत दरवाजे कधीही ओसरला. खेड तालुक्यातही रात्रीपासून पाऊस पडत नसल्याने जगबुडी नदीच्या पाणीपातळीत घट झाली. खेड-दापोली मार्गावरील वाहतूकही सुरु झाली. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. महाड तालुक्यातील एका डोहात बुडून दोघांचा मृत्यू झाला.राज्यातील अनेक भागात पूरस्थिती असतांना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊसच न पडल्याने अनेक ठिकाणी बियाणे वाया गेली आहेत. त्यामुळे या परिसरात दुबार पेरणीचा धोका निर्माण झाला आहे. उजनी, जायकवाडी ही धरणेही अद्याप कोरडी असून या धरणांतील पाणीसाठा उणे झाला आहे.