अदानीला निर्दोष ठरविणारा सेबी प्रमुख अदानीच्या एनडीटीव्ही चॅनलचा डायरेक्टर!

मुंबई- हिंडेनबर्गच्या अहवालाने अदानी कंपनीवर भ्रष्ट पद्धतीचे गंभीर आरोप झाल्यावर आता या आरोपांना पुष्टी मिळणारा कागदोपत्री पुरावा असल्याचा दावा असल्याने खळबळ माजली आहे. आज इंडिया बैठकीसाठी मुंबईत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सवाल केला की, पंतप्रधानांचे अदानीशी कोणते संबंध आहेत? अदानीच्या कंपनीशी चिनी नागरिकाचा सहभाग आहे तो चिनी कोण आहे? अदानीने कोट्यवधी रुपये फिरवून भारतात आणत शेअरचे भाव वाढवले त्याची चौकशी का होत नाही?
राहुल गांधी या प्रकरणाची माहिती देताना म्हणाले की, भारतातून 8 हजार 275 कोटी रुपये (1 बिलियन डॉलर) देशाबाहेर गेले, ते परत आले आणि हे पैसे देशात फिरले. हा पैसा अदानीचा आहे की आणखी कोणाचा आहे? यात अदानी यांचे बंधू विनोद
अदानी, चीनचे नागरिक चँग चूंग लींग आणि नासीर अली शबान अली यांचा सहभाग आहे. हे दोघे परदेशी भारतातील सर्व दळणवळणावर कब्जा ठेवणाऱ्या कंपनीशी संबंधित आहेत. अदानी यांना सेबीने दोषमुक्त केले. ज्या सेबीच्या प्रमुखाने दोषमुक्त केले तो आता अदानींच्या मालकीच्या एनडीटीव्हीचा डायरेक्टर आहे. अब्जावधी रुपये फिरवून शेअरची किंमत वाढवणारा, विमानतळे, दळणवळण मुठीत ठेवणाऱ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती का नेमत नाहीत? जी-20 चे सदस्य भारतात येतील तेव्हा ते पंतप्रधानांच्या या मित्राबाबत प्रश्न विचारतील. पंतप्रधानांनी याचा खुलासा करायला हवा. स्वत:च्या कंपनीच्या शेअरचे भाव वाढवून अदानी भारतातील महत्त्वाचे प्रकल्प व उद्योग हाती घेत आहेत. यात चिनी नागरिकाचाही समावेश आहे. अदानी व मोदींचे काय संबंध आहेत? सीबीआयसारख्या संस्था चौकशी का करीत नाही? भारतात भ्रष्टाचार नाही असे जी-20 मध्ये सांगतात आणि इथे भ्रष्ट कारभार सुरू आहे.
नेमका अहवाल काय?
ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (जउठझ) या संस्थेचा अहवाल दोन प्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पहिल्यांदाच अदानी समूहाने मॉरिशसमध्ये केलेल्या व्यवहारांचा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार 2013 ते 2018 या कालावधीत मॉरिशियस व इतर देशातील बनावट समूह कंपन्यांनी अदानीचे शेअर्स खरेदी करून बाजारात त्यांचे भाव वाढविले. नसीर अली शाबान अहली आणि चँग चूंग लिंग या दोन गुंतवणूकदारांची यात नावे आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की, हे दोघे अदानी कुटुंबाचे दीर्घकालीन व्यावसायिक भागीदार आहेत. किंबहुना मुंबईतील अनेक कंत्राटे अदानीच्या ज्या कंपनीला मिळाली आहे त्यात चँग चूंग लिंग यांच्या पुत्राचा समावेश आहे.
‘इंडिया आघाडी’च्या बैठकीआधी
ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. हे पोस्टर्स नेमके कोणी लावले? याचा उल्लेख बॅनर्सवर दिसत नाही. परंतु, सध्या हे बॅनर्स शहराचा चर्चेचा विषय ठरत आहेत. वरळी, वांद्रे, सांताक्रूझमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. लाल रंगाचा फलक असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पाटणा, बेंगळुरुनंतर मुंबईत इंडियाची तिसरी बैठक होत आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top