कोकण रेल्वेच्या मार्गांवर १६, १७ नोव्हेंबरला मेगाब्लॉक

मुंबई :

कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे कडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. याचा कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या ६ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबरला सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याकाळात मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन या गाडीचा थांबा कुमठा स्थानकापर्यंत असेल. दुपारी १२ नंतर कुमठा स्थानकातून मंगळुरू सेंट्रल ते मडगाव ही गाडी पुढील प्रवासासाठी निघेल. यानंतर १७ नोव्हेंबर रोजी मडगाव ते सावंतवाडी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी एक तास २० मिनिटे उशिराने सुटणार आहे. सावंतवाडी ते दिवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी सावंतवाडी रोड येथून २ तास पाच मिनिटे उशिराने सुटणार आहे.

याचबरोबर १७ नोव्हेंबरला मडगाव ते मुंबई मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस करमाळी ते सावंतवाडी दरम्यान वीस मिनिटे रोखून ठेवली जाईल. तर सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वीस मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. मेगा ब्लॉकचा परिणाम होणारी सहावी गाडी सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस ही आहे. १७ नोव्हेंबर ची ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वीस मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top