Home / महाराष्ट्र / Pune Crime News : पुणे हादरलं! नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा अत्याचार; मातीच्या ढिगाऱ्यामागे ओढून नेलं अन्…

Pune Crime News : पुणे हादरलं! नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा अत्याचार; मातीच्या ढिगाऱ्यामागे ओढून नेलं अन्…

Pune Crime News : विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत महिला व बालकांवरील अत्याचारांच्या...

By: Team Navakal
Pune Crime News
Social + WhatsApp CTA

Pune Crime News : विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत महिला व बालकांवरील अत्याचारांच्या घटनांनी सीमा ओलांडली आहे. नसरापूर आणि पर्वती येथील घटनांच्या जखमा ताज्या असतानाच, आता हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोरतापवाडी येथील धक्कादायक घटना
हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे एका नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केला. आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते. घटनेच्या दिवशी संधी साधून त्यांनी पीडितेला एका निर्जन स्थळी, मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न
पुणे शहरातील पर्वती पायथ्याशी देखील माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका ७० वर्षीय वृद्धाने अवघ्या ९ वर्षांच्या बालिकेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, एका जागरूक महिलेने हा प्रकार पाहिला आणि आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलीची सुटका केली. संतापलेल्या नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करून आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोपीला तत्काळ अटक केली आहे.

नसरापूर येथील क्रूरतेचा कळस
काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीला ६५ वर्षांच्या नराधमाने गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आपले पाप लपवण्यासाठी त्याने या निष्पाप बालिकेची दगडाने ठेचून हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या नराधमाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून, अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रशासनासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान
पुणे जिल्ह्यात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामीण भागापासून ते शहराच्या मध्यवस्तीपर्यंत विकृत मानसिकतेचे गुन्हेगार मोकाट सुटल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या