Chopper To Kedarnath Makes Emergency Landing On Highway | उत्तराखंडमधील (Uttarakhand) रुद्रप्रयाग येथून केदारनाथकडे निघालेल्या एका हेलिकॉप्टरला थेट महामार्गावरच इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. केस्ट्रेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे हे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे महामार्गावर उतरवावे लागल्याने मोठी दुर्घटना टळली. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पाचही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बडासू (सेरसी) हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच, गुप्तकाशी येथील मुख्य रस्त्यावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. उड्डाण घेताना ‘कलेक्टिव्ह कंट्रोल’ अडकल्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी, कॅप्टन आरपीएस सोधी या वैमानिकाने हेलिपॅडला लागून असलेल्या महामार्गावर हेलिकॉप्टर सुरक्षित उतरवले.
VIDEO | Uttarakhand: A private helicopter made an emergency landing on a road in Rudraprayag. The helicopter’s tail section fell onto a car. All passengers of the helicopter are safe. The pilot sustained minor injuries. Further details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) June 7, 2025
(Source: Third Party)
(Full… pic.twitter.com/4tHLwktald
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की हेलिकॉप्टर रस्त्याच्या मध्यभागी उभे असल्याचे आणि स्थानिक लोक घटनास्थळी धावताना दिसत आहेत. या घटनेत एका कारचे नुकसान झाले. वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंगदरम्यान किरकोळ दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,
इतर सेवा सुरळीत; तपास सुरू
उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने (UCADA) सांगितले की, उर्वरित शटल सेवा सामान्यपणे सुरू आहेत. या घटनेची माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाला देण्यात आल्याचेही यूसीएडीएने जोडले. डीजीसीएनुसार, केस्ट्रेल एव्हिएशनच्या AW119हेलिकॉप्टरने रस्त्यावर लँडिंग केले. “घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी डीएएस (एनआर) कडून एक टीम पाठवण्यात येत आहे,” असे एजन्सीने सांगितले.
चारधाम यात्रेतील वाढत्या घटना
गेल्या महिन्यात चारधाम यात्रा मार्गावर हेलिकॉप्टरशी संबंधित घडलेली ही ताजी घटना आहे. काही आठवड्यांपूर्वी, केदारनाथमध्ये एका एअर ॲम्ब्युलन्स हेलिकॉप्टरला (Air Ambulance Helicopter) तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. या हेलिकॉप्टरच्या ‘टेल रोटर’मध्ये बिघाड झाल्याने लँडिंग करताना अडचणी आल्या होत्या. मागील काही दिवसात अशाप्रकारच्या घटना सातत्याने घडताना पाहायला मिळत आहेत.