Home / महाराष्ट्र / Mumbai mayor : मुंबई महापौर, उपमहापौर निवड ! पालिकेत प्रचंड घोषणाबाजी नाट्य

Mumbai mayor : मुंबई महापौर, उपमहापौर निवड ! पालिकेत प्रचंड घोषणाबाजी नाट्य

Mumbai mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे यांची व उपमहापौरपदी शिंदे सेनेच्या संजय घाडी यांची आज बिनविरोध निवड झाली....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Mumbai mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे यांची व उपमहापौरपदी शिंदे सेनेच्या संजय घाडी यांची आज बिनविरोध निवड झाली. तब्बल 44 वर्षांनंतर मुंबई महापौर (Mumbai mayor) पदाचे भाजपाचे स्वप्न साकार झाले. या पदग्रहण समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः पालिकेच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची ही पहिलीच घटना आहे.

नूतन महापौरांना आज पहिल्याच दिवशी सभागृहात हाय व्होल्टेज ड्राम्याला सामोरे जावे लागले. सभागृहात पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाला. उबाठाच्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर निवडीला पीठासीन अधिकारी म्हणून  भूषण गगराणी यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवत निषेध केला. पेडणेकर यांचे म्हणणे होते की, सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक हा परंपरेने पीठासीन अधिकारी असतो. यावेळी उबाठाच्या सात वेळा निवडून आलेल्या श्रध्दा जाधव या पीठासीन अधिकारी होणे अपेक्षित होते. त्यावर गगराणी यांनी सांगितले की, 22 जानेवारी 2026 रोजी उपसचिव नगरविकास यांनी अधिसूचना काढून गगराणी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. यामुळे किशोरी पेडणेकर यांनी घेतलेला आक्षेप फेटाळत आहोत.


सभागृहात सुरुवातीला भाजपाच्या नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी-मोदी’ व ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ अशा घोषणा देऊन पालिका सभागृह दणाणून सोडले. तर त्यांना प्रत्युत्तर देत उबाठाच्या नगरसेवकांनी ‘मोदी मोदी’ या घोषणेला ‘चोर है.. चोर है’ म्हणत उत्तर दिले.
देवाभाऊचा गजर सुरू होताच उबाठाने ‘ठाकरे-ठाकरे’ अशा घोषणांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे नगरसेवक प्रदुषणाचा मुद्दा दर्शवण्यासाठी तोंडाला मास्क लावून आले होते. त्याआधी सकाळी महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत दाखल झाले. त्यांनी भगवे फेटे बांधले होते. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेत येताच भाजपाचे सर्व नगरसेवक सभागृहात आले.

महापौरपदी रितू तावडे यांची व उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर आजच्या सभेची सूत्रे महापौर रितू तावडे यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्या पहिल्याच  भाषणाच्यावेळी  काँग्रेस आणि उबाठाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. आजपासून मुंबईची सेवक म्हणून काम करणार असे म्हणून महापौरांनी भाषणाला सुरुवात करताच काँग्रेसच्या महिला नगरसेविका, ‘मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर… लाडकी बहीण जमिनीवर’ अशा घोषणा देत जमिनीवर बसल्या. पाचवेळा भाषणात व्यत्यय आणल्याने महापौर रितू तावडे विरोधकांवर संतापल्या. मात्र विरोधकांवर त्याचा काहीही फरक पडला नाही. उलट त्यांनी महापौर यांच्या भाषणाच्या कागदावर ‘महिला महापौर महिलांचा अपमान’ असे लिहून निषेध केला.

शिंदे गटाचे उपमहापौर संजय घाडी यांचे भाषण सुरू होताच उबाठाच्या नगरसेवकांनी ‘50 खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. त्यावर घाडी यांनी, ‘काँग्रेसच्या लाडक्या बहिणींनी खाली बसावे’ असे म्हणताच विरोधक आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी उपमहापौर यांच्या भाषणाचे कागद फाडले. उबाठाच्या नगरसेवकांनी मग सभागृह सोडले. त्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना, ‘जागा झाली आता बसा’ असे म्हणत चिमटा काढला

—————————————————————————————————————————–

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या