Beed News : नेकनूर परिसरातील १७ वर्षीय मुलगी दोन महिन्यांपासून बेपत्ता असून, तिला शोधून द्यावे या मागणीसाठी संबंधित कुटुंब सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, पोलिस ठाण्यात गेल्यानंतर कुटुंबीयांनाच मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे.
या प्रकरणी डिसेंबर २०२५ मध्ये नेकनूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कुटुंबीय सातत्याने पोलिसांकडे धाव घेत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, पाठपुरावा करत असताना पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन करून मारहाण केली आणि उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला.
न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंबाने थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली आहे. तसेच संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. यापूर्वीही त्यांनी लेखी निवेदन दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“आमची मुलगी जिवंत आहे की नाही, किमान एवढे तरी आम्हाला कळावे,” अशी आर्त विनंती मुलीच्या आईने केली आहे. दोन महिन्यांपासून हे सर्वसामान्य कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी नेकनूर पोलीस ठाण्यातील घटनेचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडून मागवला असल्याचे सांगितले. “अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. नातेवाईकांना मारहाण झाली असल्यास ते गंभीर आहे. तपासातून सत्य समोर येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.










