Home / News / Sachin Ahir joins Shinde Sena; major setback for UBT : ज्याने कधी दगडही उचलला नाही तो मला शिकवणार का?सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंवर टीका करीत पक्ष सोडला

Sachin Ahir joins Shinde Sena; major setback for UBT : ज्याने कधी दगडही उचलला नाही तो मला शिकवणार का?सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंवर टीका करीत पक्ष सोडला

Sachin Ahir joins Shinde Sena; major setback for UBT – उबाठाचे सात खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर 15 दिवसांतच उबाठाला आज...

By: Team Navakal
Sachin Ahir joins Shinde Sena; major setback for UBT
Social + WhatsApp CTA


Sachin Ahir joins Shinde Sena; major setback for UBT – उबाठाचे सात खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर 15 दिवसांतच उबाठाला आज दुसरा मोठा धक्का बसला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती वरळीतील उबाठाचे खंदे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज सकाळी शिंदेसेनेतून उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला. काही लोकांनी आयुष्यात कधी एक दगडही उचलला नाही, ते आज आम्हाला शिकवायला लागले आहेत, अशी बोचरी टीका उबाठा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. यामुळे आज आमदारांचे ऑपरेशन टायगर 2 सुरू झाल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने विधान परिषदेत उबाठाच्या आमदारांची संख्या पाच झाली आहे.


राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक जाहीर झाली. आज सकाळी 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत असताना केवळ पंधरा मिनिटे आधी अचानक शिंदेसेनेच्या वतीने उबाठाचे आमदार सचिन अहिर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते.

सचिन अहिर हे शिंदे सेनेबरोबर गेल्याचे कळताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानेही आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्टच झाले. शिवसेना ठाकरे गटाने जगन्नाथ अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली. जगन्नाथ अभ्यंकर हे शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपसभापतीचे उमेदवार असणार आहेत. या दोघांमध्येच प्रमुख लढत आहे. संख्याबळाचा विचार केला असता शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक आहे. उद्याच याचा निर्णय होईल.


या घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सुनील राऊत यांनी म्हटले की, असे अनेक धक्के शिवसेनेने याआधीही पचवले आहेत. त्यामुळे हा काही आमच्यासाठी मोठा धक्का नाही. खासदार अरविंद सावंत म्हणाले की, हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही. देशाच्या राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार एकटा व्यक्ती पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात कसा काय जाऊ शकतो? त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी. कायद्याने ते अपात्र व्हायला हवेत. त्यामुळे समाजाने आता विचार करावा. सचिन अहिर यांची विधानपरिषदेची टर्म 2028 साली संपणार आहे. त्यामुळे ते तिकडे जाऊन आमदारकी मिळवणार आहेत. उपसभापतीपदही त्यांनी पदरात पाडून घेतले. ही एकप्रकारची सौदेबाजी आहे. याला बंडखोरी नाही तर विकाऊ
आमदार म्हणतात.


दुसर्‍या बाजूला शिंदे सेनेच्या आणि भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट अशा बर्‍याच नेत्यांनी उबाठावर टीका केली. संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उबाठाचे आणखी एक ऑपरेशन केले आणि सचिन अहिर यांना उमेदवारी दिली. याला उबाठाचे नेते काय नाव देतात याकडे आमचे लक्ष आहे. आम्ही ऑपरेशन करत नाही, पण लोकांची मानसिकता त्यांच्यासोबत राहण्याची राहिलेली नाही. त्यांना दाबण्यात आल्याने त्यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. नरेश म्हस्के म्हणाले की, सचिन अहिर आमच्या पक्षात आले. त्यांचे आम्ही स्वागत करतो.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी सचिन अहिर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत त्यांचे पक्षात स्वागत केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही कोणतेही तोडकाम करत नाही, जोडकाम करतो. नुकतेच सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज सचिन अहिर यांनीही आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक सहा मतदारसंघांमध्ये जाऊन आले आणि त्यांचे सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केले आहे. खरे तर चौकार-षटकार सुरूच राहतील आणि समोरच्यांच्या विकेट पडतच राहतील. सचिन अहिर हे माजी राज्यमंत्री आहेत.

गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी मोठे काम केले आहे. विविध कामगार संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. मुंबईतील भूमिपुत्र, कोळीवाडे आणि स्थानिकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. ते ग्रासरूट स्तरावर काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाने शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. सचिन अहिर यांनी आज विधानसभा उपसभापतिपदाचा फॉर्म भरला आहे, महायुतीचा फॉर्म भरला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, हे केवळ मगरीचे अश्रू आणि पुतना मावशीचे प्रेम आहे.

2019 मध्ये देवेंद्रजींनी 50 फोन करूनही ज्यांनी एकही फोन उचलला नाही, ज्यांनी एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, अशी भाषा वापरली आणि महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवले, त्यांचे हे प्रेम बेगडी आहे. देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना हे सर्व कळते, असा थेट हल्लाबोल शिंदेंनी केला. ठाकरे गटाचे आणखी कोणते आमदार संपर्कात आहेत का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स कायम ठेवला. आजच सगळे सांगितले, तर उद्याची ब्रेकिंग न्यूज काय असेल? थोडी वाट पाहा, विकेट धडाधड पडत राहतील, असा इशारा त्यांनी दिला.

सचिन अहिर यांचे मौन


सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत उबाठावर बोलणे टाळले. त्यांना माझ्यावर बोलूद्या, मग राजकीय व्यासपीठावर मी बोलेन असे ते म्हणाले. अहिर म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. जेव्हा कोळशातून हिर्‍याची चमक दिसते आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातूनच विश्व घडवण्याचे काम करत असतो त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बहुमान देऊन मला उपसभापती पदावर नेऊन बसवले आहे. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी काम सुरू ठेवले आहे. आपल्याकडे असेपर्यंत चांगले आणि सोडून गेले की एकदम वाईट कसे होतात?

अजून किती ओरबडणार?
आदित्य ठाकरेंचा संताप


उबाठा नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, वरळी आणि शिवडी हा पक्षाचा बालेकिल्ला आहे. काहीजण पक्ष सोडून गेल्याने कोणताही फरक पडणार नाही. एकच दुर्दैव आहे की, ज्यांना आम्ही सगळे काही दिले तेच गेले. आदित्य ठाकरे भेटतच नाही, असे ही व्यक्ती बोलूच शकत नाही. कारण परवा पण आम्ही पुण्याहून एकत्र आलो. अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून किती ओरबडणार? म्हणजे स्वतः आमदार आहेत. प्रभाग समिती दिली आहे. तिथे त्यांच्याच मुलीला एनजीओचा कोटा असतो. बेस्ट समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे. शिवसेनेत उपनेता पद आहे. युनियनचे अध्यक्ष आहेत, मग अजून तुम्हाला काय पाहिजे?

हा एक प्रश्न पडतोच, म्हणजे आम्ही काही कमी दिले का? जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतो, भेटत नव्हतो तसेही होते का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत. रोज येता जाताना भेटता मग अजून काय करायचे तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? किती ओरबडणार आहात? ठाकरे पुन्हा म्हणाले की, हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. 2029 ला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फडणवीस आहेत. म्हणून त्यांचे पंख छाटले जात आहेत. नितीन गडकरी, शिवराज सिंग यांचे पंख छाटले.

राष्ट्रवादी ते शिंदेसेना व्हाया शिवसेना


सचिन अहिर हे वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्रीदेखील होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून वरळी आणि दक्षिण मुंबईतील कामगार वर्गावर सचिन अहिर यांची मजबूत पकड आहे. मात्र एकत्र शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे हे 2014 ते 2019 या काळात वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांचा पराभव केला होता.

त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून एकत्र शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी सुनील शिंदे नाराज झाले होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर त्यांच्यासाठी सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी आपली वरळीची हक्काची जागा सोडली. त्यांच्या प्रचाराची धुराही सांभाळली. याची परतफेड म्हणून ’मातोश्री’ने दोघांना विधान परिषदेची आमदारकी दिली होती. वरळीतील आदित्य ठाकरेंच्या विजयामध्ये आणि स्थानिक पक्षबांधणीमध्ये अहिर यांचा मोठा वाटा होता.

Web Title:
संबंधित बातम्या