Home / Uncategorized / Rohit Pawar : अरोरांच्या कंत्राटावरून दादा, अन् तटकरेंमध्ये जोरदार वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा..

Rohit Pawar : अरोरांच्या कंत्राटावरून दादा, अन् तटकरेंमध्ये जोरदार वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा..

Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित...

By: Team Navakal
Rohit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित एका दुर्दैवी घटनेवर खळबळजनक भाष्य केले आहे. २७ आणि २८ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रवासाच्या नियोजनावर उपस्थित केले प्रश्न-
रोहित पवार यांनी २७ जानेवारीच्या घटनाक्रमाचा दाखला देत सांगितले की, जर अजितदादा त्या दिवशी पुण्याला कारने गेले असते आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला पोहोचले असते, तर ही दुर्दैवी घटना टळली असती. प्रवासाच्या नियोजनात ऐनवेळी बदल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. “२७ तारखेला ज्या काही गोष्टी घडल्या, त्यावर मी यापूर्वीही भाष्य केले आहे. त्या दिवशी बैठकीला झालेला विलंब आणि त्यानंतर आलेल्या फोन कॉल्सचा तपशील आता जनतेसमोर येत आहे,” असे पवार म्हणाले.

विमान बुकिंग आणि स्वाक्षरीचा गूढ-
घटनाक्रम या प्रकरणातील तांत्रिक बाबींकडे लक्ष वेधताना रोहित पवार यांनी सांगितले की, एका विशिष्ट फाईलवर तातडीने स्वाक्षरी व्हावी, अशी आग्रही इच्छा एका बड्या नेत्याने व्यक्त केली होती. त्या फाईलवर स्वाक्षरी झाल्यानंतरच संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी विमावाचे बुकिंग करण्यात आले. रोहित पवार यांच्या मते, जर विमानाने प्रवास करण्याचे नियोजन आधीच ठरले असते, तर त्याचे बुकिंग २६ तारखेला संध्याकाळी किंवा २७ तारखेला दुपारीच व्हायला हवे होते. मात्र, ऐनवेळी झालेले हे बुकिंग संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

वैमानिकाच्या संपर्काची चौकशी करण्याची मागणी-
केवळ प्रवासाचे नियोजनच नव्हे, तर या घटनेशी संबंधित असलेल्या मुख्य वैमानिकाच्या (पायलट) हालचालींचीही चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ते म्हणाले की, “घटनेच्या पूर्वीच्या एक-दोन महिन्यांत संबंधित मुख्य वैमानिक कोणाच्या संपर्कात होता? त्याने कोणाच्या भेटीगाठी घेतल्या? या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. २७ तारखेपासून २८ तारखेपर्यंतच्या प्रत्येक हालचालीची आणि संपर्काची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.”

राष्ट्रवादीच्या गोटात कंत्राटावरून कलह?
राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या कंत्राटावरून उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात तीव्र मतभेद आणि वाद झाले होते, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या दाव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

कंत्राट रद्द करण्यावरून वादाची ठिणगी-
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, नरेश अरोरा यांना देण्यात आलेल्या कामाच्या कंत्राटावरून पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये एकमत नव्हते. हे कंत्राट रद्द करण्याच्या निर्णयावरून अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. “पक्षांतर्गत धोरणे आणि प्रचार यंत्रणेच्या नियोजनावरून नेत्यांमध्ये सुसंवाद नसून टोकाचे मतभेद आहेत,” असे रोहित पवार यांनी सूचित केले आहे. नरेश अरोरा यांच्या कामाची पद्धत किंवा त्यावरील खर्च यांपैकी कोणत्या मुद्द्यावरून हा वाद झाला, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विमान अपघात प्रकरणाशी जोडले दुवे-
विशेष म्हणजे, रोहित पवार यांनी यापूर्वीच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला होता. त्या संशयाला बळकटी देण्यासाठी त्यांनी आता या अंतर्गत वादाचा संदर्भ जोडला आहे. २७ जानेवारी रोजी अजित पवार यांना महत्त्वाच्या कामासाठी उशीर का झाला? या प्रश्नाचे उत्तर देताना याआधी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी थेट पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. त्या नेत्याच्या आग्रहामुळेच अजितदादांना थांबून राहावे लागले आणि त्यानंतरच पुढील दुर्दैवी घटनाक्रम घडला, असा खळबळजनक दावा पवारांनी केला होता.

‘पॉलिटिकल कन्सल्टंट’चे कंत्राट आणि विमान खरेदी; अजितदादांच्या प्रवासातील विलंबाचे रोहित पवारांनी उलगडले ‘कनेक्शन’
राजकीय रणनीतीकार (पॉलिटिकल कन्सल्टंट) नरेश अरोरा यांच्या कंत्राटावरून अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात तीव्र मतभेद झाले होते, ज्याचा परिणाम थेट अजितदादांच्या प्रवासाच्या नियोजनावर झाला, असे खळबळजनक विधान रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

कंत्राट रद्द करण्याच्या भूमिकेवरून वादाची ठिणगी-
रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित राजकीय सल्लागाराला देण्यात आलेले शेकडो कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करावे, अशी अजित पवारांची ठाम भूमिका होती. “ज्या मुद्द्यावर दादांची अजिबात संमती नव्हती, त्याच विषयावर बैठकीत प्रदीर्घ चर्चा आणि वादावादी झाली. या सल्लागाराने काही महिन्यांपूर्वीच स्वतःचे विमान खरेदी केले होते, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही,” असे सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केले. या आर्थिक व्यवहारांच्या आणि कंत्राटाच्या वादात सुनील तटकरे आणि इतर नेतेही सहभागी होते, ज्यामुळे बैठकीचा वेळ अनपेक्षितपणे वाढला.

विमानाचे गुढ आणि प्रवासाचा बदललेला मार्ग-
रोहित पवार यांनी या वादाचा संबंध थेट २७ आणि २८ जानेवारीच्या घटनाक्रमाशी जोडला आहे. त्यांच्या मते, कंत्राटाच्या विषयावरून झालेल्या वादविवादामुळे बैठकीला विलंब झाला. जर हा विलंब झाला नसता, तर अजित पवार नेहमीप्रमाणे कारने पुण्याला रवाना झाले असते. मात्र, बैठकीत वेळ गेल्यामुळे कारने जाणे शक्य झाले नाही आणि नाईलाजास्तव विमानाचा पर्याय निवडावा लागला. याच प्रवासादरम्यान २८ तारखेला ती दुर्दैवी घटना घडली, ज्याचा संदर्भ रोहित पवार वारंवार देत आहेत.

शेकडो कोटींचे व्यवहार आणि संशयाची सुई-
पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता गंभीर वळण घेत आहेत. एका राजकीय सल्लागाराकडे स्वतःचे विमान येण्याइतपत पैसा आणि त्या व्यक्तीचे कंत्राट वाचवण्यासाठी पक्षातील काही नेत्यांचा असलेला आग्रह, याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधले आहे. “दादांची स्वाक्षरी घेण्यासाठी झालेली घाई आणि त्या विशिष्ट नेत्याचा दबाव, या सर्व गोष्टींची साखळी जोडली तर सत्य बाहेर येईल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पुढे रोहित पवार सांगतात २७ जानेवारी रोजी झालेल्या एका बैठकीत अजित पवारांनी अरोरा यांच्या टीमला कडक शब्दांत सुनावले होते आणि त्यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या कंत्राटावरून पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन गट पडले होते, असा दावा रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत नरेश अरोरा यांच्या ‘पॉलिटिकल कन्सल्टंट’ टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अजित पवार आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत अरोरा यांच्या टीमवर संतापले होते. हे कंत्राट रद्द करावे, अशी अजितदादांची स्पष्ट आणि ठाम भूमिका होती. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचा कल हे कंत्राट तशाच स्वरूपात सुरू ठेवण्याकडे होता. अरोरा यांना शेकडो कोटींचे मानधन द्यावेच लागेल, असा आग्रह या नेत्यांनी धरल्यामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अजितदादा स्वपक्षातच एकटे पडले होते? प्रफुल्ल पटेलांचा फोन अन् ‘त्या’ फाईलचे गूढ; रोहित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासातील विलंब आणि त्यानंतरचा घटनाक्रम यावर आमदार रोहित पवार यांनी नवीन दाव्यांसह खळबळ उडवून दिली आहे. “अजितदादांच्या जवळचे पदाधिकारी प्रमोद हिंदूराव यांनी स्वतः या प्रकरणातील काही महत्त्वाचे तपशील समोर आणले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या एका फाईलवर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेत आणि त्यासंदर्भातील फोन कॉलमुळेच दादांना प्रवासाला उशीर झाला,” असे रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रमोद हिंदूराव यांनी या विषयावर केलेल्या खुलाशानंतर रोहित पवारांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “अजितदादांच्या बाजूने आज त्यांचे जवळचे सहकारी उघडपणे बोलू लागले आहेत, हे पाहून आनंद झाला. गेल्या चार महिन्यांपासून अजित पवार आपल्याच पक्षात एकटे पडले असल्याचे आम्हाला जाणवत होते. केवळ काही ठराविक आमदार आणि निष्ठावान पदाधिकारीच त्यांच्या पाठीशी उभे होते. मात्र, पक्षपातळीवरील मोठ्या नेत्यांची त्यांना म्हणावी तशी साथ मिळत नव्हती.”

रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत गटबाजीवरही भाष्य केले आहे. राज्य आणि देशपातळीवर काम करणारे पक्षाचे काही मोठे नेते अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नव्हते. इतकेच नव्हे तर, निवडणूक प्रचाराच्या काळातही हे नेते दादांसोबत फिरताना दिसले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. मोठ्या पदावरील नेत्यांची ही उदासीनता संशयास्पद असून, दादांना पद्धतशीरपणे एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सखोल चौकशीची पुनरुच्चारित मागणी रोहित पवार यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रवासाच्या नियोजनातील ऐनवेळी झालेले बदल, फाईलवर स्वाक्षरीसाठी आलेला दबाव आणि पक्षांतर्गत नेत्यांची वर्तणूक या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या सर्व घटनांची सत्यता बाहेर येण्यासाठी चौकशी होणे हे केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या