Amit Thackeray on Coastal Road: मुंबईच्या कोस्टल रोडवर वाहने धावताना ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू येणारा ‘म्युझिकल रोड’ प्रकल्प सध्या चर्चेत आहे. मात्र, या उपक्रमाचे स्वागत करण्याऐवजी मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हा प्रकल्प मुंबईत आणि महाराष्ट्रात असताना त्यावर मराठी गाण्याला स्थान का दिले नाही, असा मुख्य आक्षेप त्यांनी नोंदवला आहे.
मराठी संस्कृतीचा अपमान?
अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून सरकारला काही टोकदार प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की, “जर कोस्टल रोडवर गाणे वाजवायचेच होते, तर आपल्या मराठी मातीतले एखादे गाणे का निवडले नाही? ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सारखे राज्यगीत किंवा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरातील गाणे निवडले असते, तर प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून आला असता. पण दुर्दैवाने आपण पुन्हा एकदा आपली ओळख विसरलो आहोत.”
मुंबईकरांना खरंच ‘याची’ गरज आहे का? pic.twitter.com/5z76h0LomE
— Amit Thackeray (@amitrthackeray) February 12, 2026
सरकारला पाच थेट प्रश्न
अमित ठाकरेंनी केवळ मराठी गाण्यावरच नव्हे, तर या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे:
- मुंबईकरांची ही ‘बेसिक’ मागणी होती का?
- कोस्टल रोडवरील शांततेऐवजी हा रोजच्या प्रवाशांसाठी ‘गोंगाट’ ठरणार नाही का?
- गाडी चालवताना ड्रायव्हरचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता तपासली आहे का?
- मराठी अस्मितेचा विचार सरकारला स्वतःहून का सुचत नाही?
- प्रत्येक वेळी मनसेलाच का या गोष्टींची आठवण करून द्यावी लागते?
तंत्रज्ञानाचे स्वागत, पण संस्कृतीचे काय?
प्रशासनाने वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल त्यांनी अभिनंदन केले असले, तरी आपली मुळे विसरून केलेला विकास अपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मराठी संस्कृतीचा सूर उमटला असता, तर तो एक वेगळा अनुभव ठरला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आता अमित ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेनंतर सरकार किंवा मुंबई महानगरपालिका या गाण्यात बदल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









